Indian Navy Day : मुंबई : ४ डिसेंबर १९७१ या दिवशी भारतीय नौदलाने मान उंचावणारी कामगिरी केला होती. त्यामुळे जगातील नौदलांच्या इतिहासात ४ डिसेंबर भारतात नौदल दिन म्हणून सादरा केला जातो. जगातील चौथ्या क्रमांकाचे नौदल म्हणून भारतीय नौदलाची ओळख आहे. ३५ प्रमुख युद्धनौका आणि दोन अणुउर्जेवर कार्यरत असलेल्या पाणबुड्यांसह भारतीय नौदलाच्या ताफ्यात सध्या १५० विविध प्रकराच्या युद्धनौका कार्यरत आहेत. भारताच्या तिन्ही बाजूंना पसरलेला अथांग समुद्र, या भागातून तसंच पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत विविध ठिकाणी विशेषतः आखातांमधून सुरु असलेली जलवाहतूक, चीनचे वाढते वर्चस्व यामुळे गेल्या काही वर्षात भारतीय नौदलाने कात टाकली आहे.
१९७१ या वर्षाच्या सुरुवातीपासून भारत पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले होते. तीन डिसेंबरच्या संध्याकाळी पाकिस्तानने पश्चिमेकडील भारताच्या हद्दीत वायू दलाच्या विविध तळांवर हल्ले केले आणि युद्धाला सुरुवात केली. चार डिसेंबरच्या रात्री भारताच्या युद्धनौकांचा समूह पाकिस्तानच्या युद्दनौकांना, रडार यंत्रणांना चकवत कराची बंदरापासून सुमारे ४६० किलोमीटर अंतरावर येऊन स्थिरावला. या समुहात तीन विद्युत वर्गातील क्षेपणास्त्रवाहू युद्धनौका, दोन कॉर्वेट प्रकारातील युद्धनौका आणि इंधनवाहू टँकर यांचा समावेश होता.
युद्धनौकांचा निर्णायक हल्ला
चार डिसेंबरच्या रात्री हळूहळू नियोजित पद्धतीने भारतीय युद्धनौकांनी कराचीकडे आगेकूच करायला सुरुवात केली. भारतीय किनाऱ्यापासून ७० किलोमीचर अंतरावर आयएनएस नीरगटने क्षेपणास्त्र डागत पाकिस्तानच्या पीएनएस खैबर या युद्धनौकेला जलसमाधी दिली. पुढे आयएनएस निपत या युद्धनौकेने क्षेपणास्त्र हल्ला करत पीएनएस शहाजहान नावाच्या युद्धनौकेचे नुकसान केले आणि एका मालवाहू जहाजाला बुडवले. आयएनएस वीरने क्षेपणास्त्र डागत पीएनएस मुहाफिज ही युद्धनौका बुडवली. आयएनएस निपत पुढे आगेकूच करत कराची बंदराजवळ अवघ्या २६ किलोमीटर एवढ्या अंतरावर पोहचत क्षेपणास्त्र डागली, ज्यामध्ये बंदरातील इंधन साठ्याचे मोठे नुकसान झाले. या संपूर्ण मोहिमेला ऑपरेशन ट्रायडेंट असं नाव देण्यात आले होते.
चार दिवसांनी म्हणजेच आठ-नऊ डिसेंबरच्या रात्री ऑपरेशन पायथन मोहिम राबवत भारतीय नौदलाच्या तीन युद्धनौकांनी कराची बंदरावर पुन्हा हल्ला करत पाकिस्तानच्या एका इंधनावाहू युद्धनौकेचे नुकसान केले तर कराची बंदरातील आणखी एका इंथन साठा उद्ध्वस्त केला.
पाकिस्तान नौदल हादरले
या दणक्याने पाकिस्तान त्याचे नौदल हे पश्चिम भागातच म्हणजे कराची बंदराच्या आसपास ठेवू शकला, कराची बंदरात पाकिस्तानच्या युद्धनौकांना इंधनाची मोठी कमतरता जाणवली, त्यांना पुढे सरकता आले नाही. त्यामुळेच दुसरीकडे पूर्व पाकिस्तान ( आत्ताचे बांगलादेश ) च्या समुद्रात भारतीय नौदलाला पुर्णपणे वर्चस्व राखण्यास एकप्रकारे मदत झाली.