लोणी काळभोर (पुणे) : भारतीय अन्नाच्या माध्यमातून अधिक प्रमाणात कॅलरिज घेतात. लठ्ठपणा, हालचाली व व्यायामचा अभाव, चुकीची जीवनशैली व आहारशैली यामुळे मधुमेह होऊ शकतो हे सत्य आहे. आरोग्यदायी अन्न सेवन करण्याची आवश्यकता आहे. रोजच्या अन्न सेवनामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असल्यामुळे भविष्य़ात भारत हा मधुमेहाच्या रुग्णांची राजधानी म्हणून उदयास येईल, अशी चिंता चौरडिया ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप चौरडिया यांनी मत व्यक्त केले आहे.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ फुड ॲन्ड टेक्नॉलॉजी विभागातर्फे आयोजित जागतिक अन्न दिनानिमित्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चौरडिया बोलत होते. रिसर्च आणि इनोव्हेश क्लबची सुरूवात करण्यात आली. यावर्षीची जागतिक अन्न दिनाची थीम अथवा संकल्पना ‘लीव्ह नो वन बिहाइंड’ अर्थात कोणालाही मागे सोडू नका, अशी आहे.यावेळी रॉयल ग्रीटीयन मुबंईचे उपसंचालक शाम गंभीरे, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. अनंच चक्रदेव, एमआयटी स्कूल ऑफ फुड टेक्नॉलॉजी विभागाच्या प्राचार्या डॉ. अंजली भोईटे आदी उपस्थित होते.
यापुढे बोलताना प्रदीप चौरडिया म्हणाले, “पुणे फुड हब म्हणून उदयास येत आहे. जँक फुडचे सर्वांसामोर आव्हान आहे. प्रक्रिया अन्नामध्यामातून जॅंक फुडकडे आपण वळत आहोत. अन्न प्रक्रियामध्ये साखरेचा वापर अधिक होत असल्यामुळे आरोग्याला अत्यंत हानीकारक आहे. सुपर फुडमध्ये पहिले दहा फुड भारतीय आहे. आरोग्यदायक अन्नावर भर द्यावे ही काळाची गरज आहे. अन्न हे औषधी आहेत. नैसर्गिक अन्न घेण्याची पद्धत जगात वाढत आहे. भारतीय अन्नाला जगात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ही विद्यार्थ्यांसाठी संधी आहे. प्रोटिनची कमतरता भारतीय अन्नामध्ये अधिक आहे. मात्र कॅलरिजच प्रमाण अधिक आहे. आपण सर्वांनी आहारशैली बदल्यांची गरज आहे.”
याबाबत शाम गंभीरे म्हणाले, “पॉकेजिंग अन्नाच्या तंत्रज्ञानात बदल होत आहे. जगामध्ये अन्नधान्य उत्पादन आणि फुड टेक्नॉलॉजीमध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहे. सोयाबिन मध्ये भारत मोठा देश आहे. कोणत्याही कंपनीत विद्यार्थ्यांनी काम करून अनुभव घ्यावा, मात्र काही वर्षानंतर स्वत: चा उद्योग सुरू करावा. एमआयटी एडीटी विद्यापीठात विविध प्रकारच्या सुविधा आहे, याचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी कौशल्य वाढवावे. प्रस्ताविक प्राचार्या डॉ. अंजली भोईटे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अमित कुल्थे यांनी तर डॉ. फय्याज पठाण यांनी आभार मानले.”