IND VS AUS: टीम इंडियाचा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 कसोटी मालिकेत 1-3 अशा फरकाने पराभव झाला. टीम इंडियाने या 5 सामन्यांच्या मालिकेची सुरुवात विजयाने करत 1-0 ने आघाडी मिळवली होती. तरीदेखील टीम इंडियाला मालिका बरोबरीत सोडवण्यात अपयश आलं आहे. भारताने मालिका गमावली असली तरीदेखील भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने संपूर्ण मालिकेत आपली छाप सोडली आहे. त्याला जगातला अव्वल दर्जाचा गोलंदाज का म्हटलं जातं? हे बुमराहने त्याच्या या मालिकेतील कामगिरीतून सिद्ध करुन दाखवलं आहे. या मालिकेत केलेल्या कामगिरीमुळे बुमराहला ‘मॅन ऑफ द सीरिज’ पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
बुमराहने केली हरभजन सिंहच्या विक्रमाची बरोबरी..
जसप्रीत बुमराह या मालिकेतील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. बुमराहने या मालिकेतील 5 सामन्यांमध्ये 13.6 च्या सरासरीने 32 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहने 3 वेळा 5 तर 2 वेळा 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. बुमराहने हरभजन सिंहच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. हरभजन सिंह याच्या नावावर टीम इंडियाकडून बॉर्डर गावसकर ट्रॉफीत सर्वाधिक 32 विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. बुमराहला पाचव्या सामन्यातील चौथ्या डावात झालेल्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावं लागलं होतं. त्यामुळे बुमराहची हरभजनचा रेकॉर्ड तोडण्याची संधी हुकली.
बुमराहने कर्णधार रोहित शर्मापेक्षा अधिक धावा केल्या..
बुमराहने या मालिकेत नियमित कर्णधार रोहित शर्मापेक्षा अधिक धावा केल्या. तसेच बुमराहने तिसऱ्या सामन्यात आकाश दीपसह दहाव्या विकेटसाठी निर्णायक भागीदारी करत फॉलोऑन टाळण्यात निर्णायक भूमिका बजावली. बुमराहने या मालिकेत एकूण 42 धावा केल्या ज्या रोहितपेक्षा अधिक आहेत.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ब्यू वेब्स्टर, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.