IND vs AUS सिडनी: पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 181 धावांवर आटोपला. यामुळे भारतीय संघाने पहिल्या डावात चार धावांची किरकोळ आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणाऱ्या ब्यू वेबस्टरने (57) अर्धशतक झळकावले. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये भारतासाठी पहिला सामना खेळणारा प्रसिद्ध कृष्णाने खूप प्रभावित केले, त्याने कांगारू संघाच्या 3 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
सिडनी कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव 185 धावांत आटोपला होता आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 9 धावा केल्या होत्या, पण एक विकेटही गमावली होती. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी आपला डाव 9 धावांवर पुढे सुरु केला, मात्र चौथ्याच षटकात कर्णधार जसप्रीत बुमराहने मार्नस लॅबुशेनला बाद केले. डावाचे 12वे षटक आले तेव्हा मोहम्मद सिराजने त्याच षटकात सॅम कॉन्स्टास आणि ट्रॅव्हिस हेडला बाद केले. कॉन्स्टन्सने 23 धावा केल्या आणि हेड केवळ 4 धावा करून बाद झाला.
ऑस्ट्रेलियाने अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शला मालिकेतील अंतिम सामन्यातून वगळले होते. त्याच्या जागी आणखी एक वेगवान गोलंदाज असलेल्या अष्टपैलू ब्यू वेबस्टरला पदार्पणाची संधी मिळाली. 13 षटकांच्या गोलंदाजी स्पेलमध्ये त्याला एकही बळी घेता आला नाही, परंतु फलंदाजीमध्ये त्याने (57) अर्धशतक झळकावले. त्याने 57 धावांच्या खेळीत दमदार फलंदाजी केली आणि 5 चौकारही लगावले. 39 धावांवर ऑस्ट्रेलियाचे 4 फलंदाज बाद झाले होते, त्या कठीण परिस्थितीत वेबस्टरने स्टीव्ह स्मिथच्या साथीने 57 धावांची मजबूत आणि महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
टीम इंडियाची दमदार गोलंदाजी
सिडनी कसोटीच्या पहिल्या डावात भारताची उत्कृष्ट गोलंदाजी होती. जसप्रीत बुमराहने 2 विकेट घेतल्या, पण दुसऱ्या दिवशी लंचनंतर संभाव्य दुखापतीमुळे तो ड्रेसिंग रूममध्ये परतला. ड्रेसिंग रूममध्ये तो ट्रेनिंग किटमध्ये दिसला. प्रसिद्ध कृष्णाने 3, मोहम्मद सिराजनेही 3 बळी घेतले. त्याच्यासोबत नितीश कुमार रेड्डीही चमकला; ज्याने कर्णधार पॅट कमिन्सशिवाय मिचेल स्टार्कची विकेटही घेतली.