कोलकता: देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन उद्या (सोमवारी) उत्साहात साजरा होणार आहे. पण आपल्या देशात तीन जिल्ह्यांमध्ये हा दिवस १८ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. काय आहे कारण, जाणून घेऊ या…
उद्या स्वातंत्रदिन देशभर साजरा होत असताना पश्चिम बंगालमधील माल्डा, नाडिया आणि मुर्शिदाबाद या तीन जिल्ह्यांतील अनेक ठिकाणे मात्र त्याला अपवाद असतील. या ठिकाणी १५ ऑगस्टऐवजी १८ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जाईल.
ब्रिटिशांनी भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य दिले. मात्र, ब्रिटनची सत्ता असलेल्या अविभाजित भारतातून पूर्व पाकिस्तानच्या (सध्याचा बांगलादेश) ताब्यातील प्रदेशाची सीमा अद्याप निश्चित झाली नव्हती.
बंगाल आणि पंजाब या प्रांतांच्या सीमा आयोगाचे संयुक्त अध्यक्ष सर सिरिल रॅडक्लिफ यांच्याकडून ही सीमा निश्चित होण्याची सर्वांनाच प्रतिक्षा होती. अखेरीस, रॅडक्लिफ यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे १८ ऑगस्ट १९४७ रोजी दोन्ही देशांतील नव्या सीमांची घोषणा केली. त्यामुळेच, पश्चिम बंगालमधील माल्डा, नाडिया आणि मुर्शिदाबाद या तीन जिल्ह्यांत अनेक ठिकाणी १८ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो.