लहू चव्हाण
पाचगणी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पाचगणी शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदचे मुख्याधिकारी तथा प्रशासक गिरीश दापकेकर यांच्या हस्ते मुख्य चौकातील ध्वजारोहण झाल्यानंतर ‘भारत माता की जय’ ‘वंदे मातरम’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
पाचगणी शहरातील शासकीय कार्यालयात दर वर्षी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जातो. या वर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहर परिसरात मोठ्या उत्साहाचे व आनंदाचे वातावरण दिसून आले. कोरोना महामारीमुळे दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेतून सावरल्यानंतर नागरिक मोठ्या आनंदाने ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी झाले होते.
सकाळी पालिका कार्यालयात गिरीश दापकेकर यांच्या हस्ते महात्मा गांधी व जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सकाळी ७ : ४५ वाजता शाळा क्रमांक १, आठ वाजता पालिका कार्यालयात तर ८ : २५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्याधिकारी तथा प्रशासक गिरीश दापकेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष लक्ष्मी कऱ्हाडकर, शेखर कासुर्डे, नानासाहेब कासुर्डे, माजी नगरसेवक नारायण बिरामणे, विनोद बिरामणे, अनिल वन्ने, दिलावर बागवान, माजी नगरसेविका अपर्णा कासुर्डे, हेमा गोळे, सुमन गोळे, निता कासुर्डे, रेखा कांबळे, सुलभा लोखंडे, रेखा जानकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, पाचगणी पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पवार यांच्या नेतृत्वाखाली ध्वजाला मानवंदना देण्यात आली.