आदित्य बोराटे

पुणे : इंदापूर शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने इंदापूर नगर परिषदेला अत्याधुनिक सिवर सक्शन-जेटिंग-डीवॉटरिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आले. या मशीनचे लोकार्पण राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने पीपीई (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट) सुरक्षा किटचे वितरण करण्यात आले.

यावेळी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे म्हणाले, “महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून इंदापूर नगर परिषदेला अधिकाधिक निधी व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या सुविधांचा प्रभावी वापर करून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.”
नगराध्यक्ष भरत शहा यांनी सांगितले की, नव्याने उपलब्ध झालेल्या अत्याधुनिक सिवर सक्शन-जेटिंग-डीवॉटरिंग मशीनमुळे शहरातील सांडपाणी वाहिन्या व गटारांची स्वच्छता अधिक जलद, सुरक्षित आणि प्रभावीपणे करता येणार आहे. त्यामुळे स्वच्छता व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होऊन नागरिकांना अधिक स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणाचा लाभ मिळेल.
मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी सांगितले की, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना पीपीई सुरक्षा किटचे वितरण करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरणात काम करता येणार असून शहरातील स्वच्छता सेवा अधिक सक्षम करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
या कार्यक्रमास पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, नगराध्यक्ष भरत शहा, मुख्याधिकारी रमेश ढगे, नगरसेवक, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






