विशाखापट्टणम: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत 0-2 असा (IND vs Sounth Africa) पराभव स्वीकारल्यानंतर (One Day Match) भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत जोरदार पुनरागमन केले. के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशी जिंकत पराभवाचा बदला घेतला. विशाखापट्टनम येथे झालेल्या निर्णायक तिसऱ्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेटने विजय मिळवला. (Cricket News)
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्याच षटकात अर्शदीप सिंगने रयान रिकेल्टनला शून्यावर बाद केले. त्यानंतर क्विंटन डी कॉक आणि कर्णधार टेम्बा बावुमा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी करत डाव सावरला. मात्र रवींद्र जडेजाने बावुमाला 48 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी अचूक गोलंदाजी करत आफ्रिकेच्या फलंदाजांना दडपणात ठेवले. अखेर 47.5 षटकांत दक्षिण आफ्रिकेचा डाव 270 धावांत संपला आणि भारतासमोर 271 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
भारताकडून गोलंदाजीत प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 4 विकेट घेतल्या. अर्शदीप सिंग आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. लक्ष्याचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांनी भारताला अफलातून सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 155 धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने 75 धावा करत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 61वे अर्धशतक पूर्ण केले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20000 धावांचा टप्पा गाठला.
यानंतर विराट कोहली मैदानात उतरला आणि यशस्वी जैस्वालसोबत विजय सहज केला. यशस्वी जैस्वालने आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावत 121 चेंडूत 116 धावा केल्या. विराट कोहलीने सलग चौथ्या सामन्यात अर्धशतक करत नाबाद 65 धावांची खेळी केली. भारताने हे लक्ष्य 43 षटकांत पूर्ण करत मालिका जिंकली. ही मालिका रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी भारतात खेळलेली अत्यंत संस्मरणीय ठरली.







