दिनेश सोनवणे
दौंड : स्वामी चिंचोली ते मलठण या रस्त्यावरील पुलाची उंची वाढवावी. अशी मागणी स्वामी चिंचोली गावचे माजी सरपंच अझरुद्दीन शेख, वाटलूजचे सरपंच युवराज शेंडगे, मुकेश गुणवरे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे केली आहे.
दौंड आणि इंदापूर या दोन तालुक्यांना जोडणारा रस्ता म्हणून स्वामी चिंचोली -मलठण हा रस्त्या महत्वाचा आहे. इंदापूर-दौंड तालुक्याच्या शिवेवर असणाऱ्या मलठण,वाटलूज राजेगाव,भिगवण स्टेशन या गावातील लोकांना रहदारीसाठी हा रस्ता सोईस्कर ठरतो. परंतु पावसाळा चालू झाला की रोटी नाल्यावर उभारण्यात आलेल्या पुलाची उंची कमी असल्यामुळे या ओढ्याला पूर आला की पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात होते. या मार्गावरून रहदारी करण्यास अडचणीचे ठरते.
या भागातील शेतकरी बांधवांचा हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक ही मोठया प्रमाणवार आहे. पावळ्यात हा ओढा पूर्ण क्षमतेने वाहू लागल्यावर यावरील रहदारी पूर्ण बंद होते. त्यामुळे नागरिकांना दुसऱ्या रस्त्याचा वापरत करावा लागत आहे. परिणामी अनके अडचणी निर्माण होत आहेत.
नागरिकांना या रस्त्यावरील पाण्याचा अंदाज न आल्याने काही मोटार सायकल वाहून जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत.पावसाळा संपला तरी पुढचे दीड-दोन महिने कमी पातळीत का होईना पाणी हे पुलावरून वाहत असते.
दरम्यान. सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्यासंदर्भातील प्रश्न मार्गी लावावा. त्याचबरोबर दोन्ही तालुक्याचे प्रतिनिधी व बारामती च्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पुलाची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.