लहू चव्हाण
पाचगणी : ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त देशभरात १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हा उपक्रम यशस्वी करावा. दिलेल्या कालावधीत प्रत्येक सरकारी, निमसरकारी व खासगी आस्थापना तसेच सहकारी व शैक्षणिक संस्थांच्या इमारतींवर राष्ट्रध्वज उभारावा. तसेच नागरिकांना त्यांच्या घरावर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वज उभारण्यासाठी प्रोत्साहित करावे.’ असे प्रतिपादन मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी केले.
पांचगणी नगरपालिकेत राष्ट्रध्वज विक्रीकेंद्राचे उद्घाटन मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दापेकर बोलत होते.
यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मेहुल पुरोहित, निलेश चौरसिया, मुराद खान कार्यालयीन निरीक्षक दिलीप कुमार रणदिवे, कार्यालयीन कालिदास शेंडगे, लेखापाल प्रवीण मोरे, गणेश कासूर्डे, नितीन मर्ढेकर, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यापुढे बोलताना दापेकर म्हणाले, “घरोघरी तिरंगा’ उपक्रमांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या दरम्यान तीन दिवस घरांवर उभारलेले राष्ट्रध्वज दररोज संध्याकाळी खाली उतरवायची गरज नाही. तसेच या कालावधीत राष्ट्रध्वज काळजीपूर्वक जतन करावा. तरी नागरिकांनी ध्वज खरेदी करुन ‘घरोघरी तिरंगा’ हा उत्सव साजरा करावा. तसेच ध्वजसंहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश या वेळी त्यांनी दिले.
दरम्यान, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवअंतर्गत जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे स्मरण व्हावे, या उद्देशाने १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत देशात ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘घरोघरी तिरंगा’ हा अनोखा उपक्रम राबवण्यात येत असताना नागरिकांना तिरंगा सहज उपलब्ध व्हावा, यासाठी पांचगणी नगरपालिकेचा वतीने पालिका कार्यालयात तिरंगा विक्री केंद्र सुरू केले असून, यावेळी मेहुल पुरोहित यांना पहिला ध्वज खरेदी करून या उत्सवाची सुरुवात केली.