उरुळी कांचन, (पुणे) : घरात कुणीही नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह १ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल पळवून नेल्याची घटना घडली आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तुपेवस्ती परिसरातील ज्योतीबा मंदिराजवळ हि घटना सोमवारी (ता. ०६) ते बुधवारी (ता. ०८) या दरम्यान घडली आहे.
याप्रकरणी निता गोवर्धन पवार (वय – ३१, रा. ज्योतिबा मंदिराजवळ तुपे वस्ती, उरुळी कांचन ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निता पवार या कुटुंबीयांसोबत उरुळी कांचन परिसरात राहतात. सोमवारी (त. ०६) घरातील सर्वजण घराला कुलूप लावून रुग्णालयात गेले होते. बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घरी आले तेंव्हा त्यांना घराचे सेफ्टी दरवाजाचा उघडलेल्या अवस्थेत आढळून आला. घरात जाऊन पाहणी केली असता कपाटाचे कुलूप कापून घरातील साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले दिसून आले.
यावरून घरात चोरी झाल्याचे समजले. तसेच घरातील बेडरुममधील लोखंडी कपाटाचे दरवाजाचे कुलूपहि तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. कपाटातील पाहणी केली असता ड्राव्हर मध्ये ठेवलेले १ लाख १२ हजार रुपये किमतीचे रोख रक्कम व सोन्या – चांदीचे दागिने आढळून आले नाहीत.
दरम्यान, याप्रकरणी निता पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे करीत आहेत.