लोणी काळभोर, (पुणे) : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, ‘मोरया रे बाप्पा मोरया रे’… असा जयघोष व ढोल-ताशांच्या निनादात पूर्व हवेलीतील लोणी काळभोर लोणी स्टेशन, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात बुधवारी (ता. ३०) गणरायांची उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. त्यामुळे लाडक्या बाप्पांचे स्वागत करण्यासाठी बच्चे कंपनीपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या उत्साहाला उधाण आले होते.
गणरायांच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशीही अनेक मंडळे वाजत-गाजत मिरवणूक काढून गणरायांचे स्वागत करतात. गुरुवारीही बाल गणेश मंडळांसह शहरातील काही प्रमुख मंडळांनी पारंपरिक ढोल-ताशा, बँडबाजा यांच्या गजरात गणरायांची मिरवणूक काढून विधिवत प्रतिष्ठापना केली. गणपती कारखाने, येथे गणरायांची मूर्ती घेऊन जाण्यासाठी गणेशभक्तांची दिवसभर लगबग सुरू होती. ढोल-ताशांचा गजर करीतच मंडळांचे कार्यकर्ते मूर्ती घेऊन जाण्यासाठी येत होते. ढोल पथकांची गर्दी होती. त्यामुळे ज्या मंडळाचे स्वतःचे ढोलपथक नाही, अशी मंडळे मूर्तीची खरेदी केल्यानंतर ती वाजत-गाजत घेऊन जाण्यासाठी या पथकांची मदत घेताना दिसत होती. बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायांची प्रतिष्ठापना सायंकाळी करणे पसंत केले.
लोणी काळभोर, उरुळी कांचन परिसरात गणरायांच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशीही अनेक मंडळे वाजत-गाजत मिरवणूक काढून गणरायांचे स्वागत करताना दिसून येत होती. बुधवारी बाल गणेश मंडळांसह शहरातील काही प्रमुख मंडळांनी पारंपरिक ढोल-ताशा, बँडबाजा यांच्या गजरात गणरायांची मिरवणूक काढून विधिवत प्रतिष्ठापना केली. सकाळपासूनच उत्साहाचे व जल्लोषपूर्ण वातावरण होते. गणरायांची मूर्ती घेऊन जाण्यासाठी गणेशभक्तांची दिवसभर लगबग सुरू होती. ढोल-ताशांचा गजर करीतच मंडळांचे कार्यकर्ते मूर्ती घेऊन जाण्यासाठी येत होते. काही ठिकाणी गणरायांना विराजमान केल्यानंतरही मंडळांचे कार्यकर्ते मूर्तीभोवती सजावट करण्याच्या कामात व्यग्र होते.
घरोघरी उत्साह…!
घरोघरी गणरायांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. मंगळवारी सायंकाळीच बहुतेकांनी गणरायाची मूर्ती घरी आणली होती, तर काहींनी बुधवारी सकाळी कुटुंबीयांसह मूर्तीविक्रेत्यांकडे जाऊन गणरायाला घरी आणले. मुहूर्ताच्या वेळेत गणरायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी घरोघरी लगबग सुरू होती. अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या घरातील गणरायांसोबत सेल्फी काढून टाकले होते. गणेशोत्सवाच्या एकमेकांना सोशल मीडियावर शुभेच्छा देण्यातही गणेशभक्त आघाडीवर होते.