उरुळी कांचन, (पुणे) : पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात शेतांमध्ये सतत पडत असलेल्या पावसाचे पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाण्यामुळे पिके सडल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वाया गेला आहे. त्यामुळे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने फ्लॉवर, कोबी, भेंडी, काकडी, मिरची, वांगी, टोमॅटो या भाजीपाला पिकांबरोबरच झेंडू, चारा पिके व सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून पिकांचे संगोपन केले आहे. परंतु सततच्या संततधार पावसाने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा भांडवली खर्चही वसूल होणार नाही. यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. कृषी विभागाने तातडीने पंचनामे करावे, अशी मागणी नायगावचे शेतकरी विशाल शेलार, उरुळी कांचनचे शेतकरी संभाजी कांचन व अमोल भोसले व भाऊ ढवळे यांनी केली आहे.
पूर्व हवेलीत मागील आठ दिवसापासून पडत असलेला पाऊस बाजरी, पालक, कोथिंबीर, शापू आदी पिकांसाठी अडथळा ठरत आहे. शेतातील ओल हटत नसल्यामुळे उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बागायती पट्ट्यातील परिसरातील जमिनीत ओलावा कमी होत नाही. त्यातच पाऊसही उघडीप देत नाही. परिणामी, काढणीस आलेल्या पिकास पाऊस अडथळा ठरत असून उभी पिके आडवी झाली आहेत.
दरम्यान, पावसाचा जोर वाढतच असल्यामुळे शेतकऱ्यांपुढे संकटांची मालिका सुरूच आहे. हातातोंडाशी आलेल्या खरिपातील सर्वच पिके वाया जाण्याची भीती व्यक्त होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सततच्या पावसामुळे पिके रोगाला बळी पडली आहेत. पिकांवर औषध फवारणी करूनही उपयोग होत नाही. औषधे फवारली तरी पावसामुळे ते वाया जात आहे. रोग आटोक्यात येत नसल्याने शेतातील पिके करप्याने जागच्या जागेवर बसली आहेत. पिके सोडून देण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे. त्यातून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे.
याबाबत थेऊर येथील शेतकरी मिथुन तारू म्हणाले, “या दिवसात थेऊरसह परिसरात कांदा, गहू लागवडीची धांदल सुरू असते. परंतु, यंदा पावसामुळे कांदा लागवड मंदावली आहे. काही ठिकाणी वाफसा नाही, तर काही ठिकाणी पावसाने रोपे वाया गेली आहेत. एखाद्या ठिकाणी लागवड केली आणि पाऊस झाला, तर ही लागवड वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन शेतकरी कांदा लागवड करीत आहेत.