पुणे : पुण्यात पोलीस कर्मचारीच असुरक्षित असल्याचे चित्र समोर आले आहे. भररस्त्यात हातात कोयता घेऊन वाहन चालकांना धमकावल्याने झालेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना दाम्पत्याने शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (दि. १७) कोंढवा परिसरातील शिवनेरीनगर येथे घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस शिपाई किरण झेंडे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी महेश विलास लोणकर (वय-३१, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) याच्यासह पत्नीवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई झेंडे आणि मेमाणे कोंढव्यातील शिवनेरीनगर भागात बुधवारी रात्री गस्त घालत होते. यावेळी शिवनेरीनगर परिसरात कोंडी झाली होती. कोंडी सोडविण्यासाठी झेंडे आणि मेमाणे त्या ठिकाणी गेले. तेव्हा आरोपी महेश लोणकर हातात कोयता घेऊन वाहन चालकांना धाक दाखवित होता. तसेच जमलेल्या रहिवाशांना शिवीगाळही करत होता.
या घटनेची माहिती मिळताच झेंडे व मेमाणे तेथे गेले. पोलिसांनी कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पोलिसांना पाहताच लोणकरच्या पत्नीने त्याच्याकडील कोयता काढून घेऊन लपविला. तसेच कोंडी सोडविणाऱ्या पोलिसांना मोठ्या आवाजात शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणला. या घटनेचा अधिकचा तपास सहायक निरीक्षक थोरात करत आहेत.