पुणे : डॉक्टरांनी ‘ब्रेन डेड’ घोषित केलेल्या १० वर्षाच्या चिमुकलीच्या घरच्यांनी अवयवदानाला संमती दिल्याने तिचे हृदय, यकृत आणि किडनी हे तीन अवयव तीन वेगवेगळ्या रुग्णांवर प्रत्यारोपित करण्यात आले.या दहा वर्षाच्या चिमुकलीमुळे तीन जणांना नवीन जीवनदान मिळाले आहे. मृत्यूपश्चात अवयवदान होणारी ती सर्वांत कमी वयाची मुलगी ठरली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, ही मुलगी चिखलीतील कुडाळवाडी येथे राहते. ती, तिच्या कुटुंबातील सर्वांत थोरली होती व ती अभ्यासात अत्यंत हुशार होती. ती कुटुंब, मित्र व शाळांतील शिक्षकांचीही लाडकी होती. तिचे आईवडील हे कचरा वेचक आहेत. त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदर्निवाह चालतो. तिला चार वर्षाचा लहान भाऊ आहे.
दरम्यान, तिचा काही दिवसांपूर्वी रस्ता क्रॉस करताना अपघात झाला होता. उपचारासाठी पिंपरी चिंचवड येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केले. यानंतर तिच्या घरच्यांनी अवयवदानासाठी संमती दिली.