पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीचा धडाका सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुण्यात मोठा धक्का बसला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीत पुणे शहरातील शिवसेना शिंदे गटाची धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत विचारात घेतले नसल्याची नाराजी व्यक्त करत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुणे शहरातील शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांना सतत डावलले जात होते, तसेच त्यांचे ऐकले ही जात नव्हते, त्यामुळे शिंदे गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज होते. नाराजीतून ऐन निवडणुकीत शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती मिळत आहे. एवढंच नाही तर युवासेनेतील आणखी काही पदाधिकारी आणि वरच्या फळीतील पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे ही बोलले जात आहे. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या धामधुमीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळेसही शिंदे गटातील नाराजीनाट्य समोर आले होते. मोदी शिंदे गटाच्या शहराध्यक्षांच्या घरी जेवणासाठी जाणार होते त्यांच्या कार्यकर्त्यांनी यासाठी जोरात तयारी देखील केली होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी ऐनवेळी जेवणास नकार दिला होता, त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सुर पहायला मिळाला होता.