पुणे : पुणे शहरातील सदाशिव पेठेमध्ये एका भिंतीवर हिरवा रंग लावून चादर आणि फुलं चढवल्याचा प्रकार समोर आला होता. ही घटना लक्षात येताच भाजप खासदार मेधा कुलकर्णी आणि काहींनी मिळून पुन्हा त्या हिरव्या रंगावरती भगवा रंग देऊन त्या ठिकाणी एक गणपतीचा फोटो ठेवला आहे. पुणे शहरातच नाही, तर महाराष्ट्रसह इतर अनेक ठिकाणी असे प्रकार सध्या वाढले असल्याचा दावा मेधा कुलकर्णी यांच्याकडून करण्यात आला आहे. आपल्या आजूबाजूला काय घडतंय याकडे एक सजग हिंदू म्हणून आपण लक्ष देऊया, कृती करूया, असं आवाहन भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलं आहे. या ठिकाणी भगवा रंग देत असतानाचे फोटो आणि त्यांसंबधीची पोस्ट मेधा कुलकर्णी यांनी त्यांच्या सोशल मिडियावरती शेअर केली आहे.
पोस्टमध्ये काय म्हटलंय?
“काल सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या शेजारील गल्लीमध्ये हिरवा रंग देऊन तिथे हार, फुले, अगरबत्ती लावून पूजा करण्यात आल्याचे व्हाट्सअप व्हायरल झाले. मी आज आवर्जून त्या ठिकाणी शहानिशा करण्यासाठी गेले. आधी खात्री करून घेतली आणि मग श्री संग्राम ढोले पाटील, संकेत मेहंदळे, यशपाल जाधव आणि श्री. दातेरे यांच्या समवेत हिरवा रंगावर भगवा रंग असा चढवला की मजा आली. पुणे शहरातच नाही, तर महाराष्ट्रसह इतर अनेक ठिकाणी हे प्रकार सध्या वाढले आहेत. आधी छोटेखानी स्वरूप असलेले असलेली ही स्थळे अचानक नंतर काबीज केली जात आहेत. आपण सतर्क राहूया. माझी सर्वांना एकच विनंती आहे आपल्या आजूबाजूला काय घडतंय याकडे एक सजग हिंदू म्हणून आपण लक्ष देऊया कृती करूया. आवश्यकता लागल्यास आम्हाला नक्की सांगा माझा दूरध्वनी क्रमांक इथे देत आहे”, अशी पोस्ट मेधा कुलकर्णी यांनी शेअर केली आहे.
नेमकं काय घडलं?
पुणे शहरातील सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या शेजारील गल्लीमध्ये एका भिंतीला हिरवा रंग देऊन तिथे हार, फुले, अगरबत्ती लावून पूजा करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. याबबातची माहिती आणि व्हिडिओ देखील सोशल मिडियावरती फिरत होते. त्यानंतर याची माहिती मिळताच भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह काहींनी या हिरवा रंग दिलेल्या भिंतीवरती पुन्हा भगवा रंग दिला आणि तिथे गणपतीचा फोटो ठेवला.