पुणे : येथील चंदननगर भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नी नांदायला येत नसल्याच्या रागातून एका तरूणाने पोलीस चौकीतच अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी नवनाथ कचरू लोखंडे (वय २६ रा. डोमखेल रस्ता, वाघोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पोलीस शिपाई मुकेश पानपाटील (वय ३१) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ लोखंडे आणि त्याच्या पत्नीत काही कारणामुळे वाद झाले होते. त्यामुळे ती माहेरी निघून आली होती. सासू-सासऱ्यांच्या सांगण्यावरुन पत्नी नांदायला येत नसल्याने नवनाथ चिडला होता. तो सासुरवाडीत गेला.
त्यावेळी त्याने पत्नीच्या मोबाइलवर संपर्क साधला. तेव्हा तिने चंदननगर पोलीस ठाण्याच्या महात्मा फुले पोलीस चौकीत असल्याचे सांगितले. काही वेळानंतर तिचा पती नवनाथ त्याजागी पोहोचला. पोलीस चौकीत जाताना त्याने दुचाकीतील पेट्रोल बाटलीत भरले.
पोलीस चौकीत जाऊन त्याने सासू-सासऱ्यांविरुद्ध तक्रार केली. त्याची पत्नी नांदायला येत नसल्याने संतापलेल्या नवनाथने अंगावर बाटलीतील पेट्रोल ओतून घेतले. त्यावेळी पोलीस चैाकीतील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून त्याला रोखले.