पिंपरी : अनैतिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर लग्न करण्यास नकार दिल्याने प्रियकराचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना चिंचवड येथील व्हाईट हाऊस लॉजिंगमध्ये सन 2021 मध्ये घडली होती. या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या प्रेयसीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपसह एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
पैगंबर गुलाब मुजावर (वय-35 ) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. तर तुलसी पप्पु बाबर (वय-29) , रा. यशवंत कॉलनी, साने चौक, चिखली, पुणे) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी समीना पैगंबर मुजावर (वय-32, महात्मा फुलेनगर एम आय डी सी भोसरी पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी समीना व पैगंबर हे नात्याने पती-पत्नी आहेत. पैगंबर हे पिंपरी परिसरातील एका कपड्याच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करीत होते. तर आरोपी तुलसी व पैगंबर यांचे एक वर्षापासून अनैतिक संबंध होते. दरम्यान, आरोपी तुलसीने पैगंबर मुजावर यांना कामावरुन चिंचवड येथील व्हाईट हाऊस लॉजिंग बोर्डींग येथे भेटण्यासाठी बोलावून घेतले. पैगंबर भेटण्यासाठी गेल्यानंतर पैगंबर हा लग्न करण्यास नकार देत आहे, याकारणावरुन त्या दोघांमध्ये वाद झाला. आणि यातूनच तुलसीने पैंगबर मुजावर याचा ओढणीने गळा आवळुन खून केला. अशी फिर्याद समीना मुजावर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात दिली होती. पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली होती.
सदर गुन्ह्याचा खटला जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकारी वकील नामदेव तरळगटटी यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी तुलसी बाबर या महिलेला दोषी धरून जन्मठेप व एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हे आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी दिले आहेत.
दरम्यान, या खटल्यात सरकारी वकील नामदेव तरळगटटी यांना पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलंग, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेट्टी व हवालदार बी टी भोसले यांचे सहकार्य मिळाले.