-संतोष पवार
पळसदेव : विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी शाळेतल्या आठवणी कायमच्या मनात घर करून राहतात. याचा प्रत्यय पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयात नुकत्याच झालेल्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यात आला. पळसनाथ विद्यालयात सन 2003-04 या वर्षातील इयत्ता 10 वीच्या वर्गात शिक्षण घेणारे विद्यार्थी स्नेहमेळाव्या साठी उपस्थित होते. ‘अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती ‘ उक्तीप्रमाणे यावेळी विद्यार्थ्यांना आपल्या शालेय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा मिळाला.
सुरुवातील प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील दिवंगत शिक्षक विद्यार्थी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्व विद्यार्थ्यानी आपला परिचय करून दिला. उपस्थित सर्व माजी शिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. तब्बल 20 वर्षानंतर भेटलेले मित्र – मैत्रिणींनी आपली विचारपूस करून अनेक शालेय आठवणी जागृत करून सुसंवाद साधला. स्नेह मेळाव्यासाठी विद्यालयातील माजी शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर मुख्याध्यापकांना निमंत्रित करण्यात आले होते.
विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःचे करिअर घडवुन आणल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसुन येते होते. ऋणानुबंध आणि कृतज्ञतेच्या भावनेतून विद्यालयाच्या 2003-04 वर्षीच्या 10 वीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयास एक संगणक सीपीयु आणि दोन युनिट सप्रेम भेट दिले. यावेळी माजी विद्यार्थी आकाश कांबळे याने विद्यालयासाठी पाच लाख रुपयांचा निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. स्नेहमेळाव्यानिमित्त स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी विद्यालयाचे माजी विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेत्तर, मुख्याध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन अतुल माळवदकर, किरण काळे, सुजित मोरे, अक्षय होरणे, संदिप शेलार, सोमनाथ काळे, सचिन बनसुडे, सूरज डोईफोडे, संकेत नाईकवाडी, अतुल फासे आदिंसह सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर डोंगरे, दिपीका भिसे वृषाली कासार, अश्विनी बडे यांनी केले तर आकाश कांबळे यांनी आभार मानले.