अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चेष्टामस्करीच्या रागातून मित्रानेच मित्राचा कात्रीने खून केल्याची घटना घडली आहे. शहरातील मुकुंदनगर येथील जिलानी मेडिकलमध्ये शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
जिशान रुस्तमअली खान (वय १८. रा. मुकुंदनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शमशुद्दीन निजामुद्दीन खान (रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी मुकुंदनगरमधील जिलानी मेडिकलजवळ आरोपी शमशुद्दीन खान, जिशान खान, रेहान अब्दुलहक शेख फैजान सोहराबअली खान असे चौघे जण गप्पा मारत बसले होते. ते एकमेकांची चेष्टामस्करी करीत होते. त्यावेळी आरोपी शमशुद्दीन खान यास चेष्टामस्करीचा राग आल्याने त्याने मेडिकलच्या काउंटरमधील कात्री घेवून जिशानच्या पाठीत वार केले.
इतर दोघांनी त्याचा वाद सोडविला. त्यानंतर जिशान खान यास इरफान खान व जावेदअली खान यांनी उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, शनिवारी सकाळी साडेदहा वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नसीब अली रूस्तमअली खान यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दरम्यान, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, शहराचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांनी घटनास्थळी भेट देवून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मुलगीर यांना तपासाच्या सूचना केल्या आहेत.