नवी दिल्ली : माजी पंतप्रधान दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ स्मारक बनवण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली आहे. स्मारकासाठी काही स्थानांची पाहणी करण्यात आली असून, डॉ. सिंग यांच्या कुटुंबीयांना यापैकी एक ठिकाण निवडण्यास सांगण्यात आले आहे. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (सीपीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांनी राजघाट, राष्ट्रीय स्मृतीस्थळ आणि किसान घाटच्या आजूबाजूच्या परिसराचा आढावा घेतला. यानंतर स्मारकासाठी काही संभाव्य जागा निवडण्यात आल्या आहेत. या जागांची माहिती डॉ. सिंग यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली असून, त्यापैकी एकाची निवड करण्यास सांगण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
अंतिम ठिकाणाची निवड झाल्यानंतर स्मारकाच्या निर्माण प्रक्रियेचा मार्ग मोकळा होईल. पण काम सुरू करण्यापूर्वी ट्रस्टच्या निर्मितीबरोबर काही महत्त्वपूर्ण औपचारिकतेची पूर्तता करावी लागणार आहे. सरकार स्मारकासाठी एक ते दीड एकर जागा देण्याचा विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. देशातील आर्थिक सुधारणांचे शिल्पकार मानले जाणाऱ्या मनमोहन सिंग यांचे २६ डिसेंबर रोजी निधन झाले होते.