अजित जगताप
सातारा : अस्मानी व सुलतानी संकटाने शेतकरी वर्ग सामना करीत असतानाच खटाव तालुक्यातील खातगुण-विसापूर हद्दीतील खंडाने घेतलेल्या शेतजमिनीतील एका शेतकऱ्याच्या दोन एकर सोयाबीन पीक अज्ञात व्यक्तीने जळाले.मात्र, पंचनामा करण्यासाठी कोणीही प्रतिसाद न दिल्याने सातारा जिल्हा शिवसेनेने महसूल विभागाचा जाहीर निषेध केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, खटाव तालुक्यातील खातगुण-विसापूर हद्दीतील मागासवर्गीय शेतकरी अधिक यादव यांचे शेत खंडाने घेऊन पत्रकार व शेतकरी पंकज कदम हे चार वर्षे शेती करीत आहेत.जुलै महिन्यात त्यांनी सोयाबीन पेरले होते. पेरणी, नांगरट, भांगलन, काढणी अशी मशागत करण्यासाठी सुमारे चाळीस ते पंचेचाळीस हजार खर्च केला होता.शेतीमधील दोन एकरातील सोयाबीन पीक काढून मळणीसाठी ठेवला होता. शनिवारच्या रात्री अज्ञात व्यक्तीने संपूर्ण सोयाबीन पेटवून दिला.
यामध्ये एक लाख ते सव्वा लाख रुपयाचे नुकसान झाले. सदरची घटना समजताच शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख प्रताप जाधव, विभाग प्रमुख मुघटराव कदम यांनी महारकी नावाच्या शिवारातील शेतामध्ये जाऊन पाहणी केली. किमान दोन एकर क्षेत्रातील सोयाबीन काढून ठेवलेले पीक अज्ञात व्यक्तीकडून जाळण्यात आले आहे यावेळी त्या विभागातील मंडलाधिकारी, तलाठी यांना तातडीने फोन केले असता दोघांचे ही फोन बंद लागले होते. अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जाधव यांनी दिली.
शेतकरी अतिवृष्टी विविध समस्यातून चालला असताना समाजात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेला संबोधले जाते. अशा ग्रामीण पत्रकारांना दबाव आणण्यासाठी समाजातील काही विकृत लोकांकडून असे प्रकार होत आहेत याला आळा घालावा अशी मागणी सातारा जिल्हा शिवसेनाप्रमुख प्रताप जाधव यांनी केली आहे .
संबंधित महसूल विभागाने तात्काळ पत्रकार व शेतकरी पंकज कदम यांच्या मेहनतीने तयार केलेल्या सोयाबीन शेतीमधील या जळीताचा पंचनामा करून शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. पत्रकार व शेतकरी कदम यांना सोयाबीन पिकाची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शिवसेना सातारा जिल्हा अध्यक्ष प्रताप जाधव प्रयत्न करीत आहेत.
ज्याठिकाणी सोयाबीन पीक ठेवले होते. त्याच ठिकाणी जळीत प्रकरणाने पिकाची राख झाल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी साचले होते.महसूल विभागाचे काही जण दिवाळी साजरी करण्यात गुंतले असले तरी त्यांनी साधा फोन उचलण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.