पुणे : फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (एफटीआयआय) हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (ता. २३) समोर आला होता. विद्यार्थी संघटनांकडून ‘एफटीआयआय’च्या आवारात बाबरी मशीद पाडल्याच्या निषेधार्थ फलक लावल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी ‘एफटीआयआय’मधील विद्यार्थी संघटनेच्या सात पदाधिकाऱ्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत ऋतुजा अतुल माने (रा. कोथरुड) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, सायनतन चरण चक्रवर्ती, नाथन चक्रपाध्याय, मनकलन चक्रवर्ती, त्रिशा बंदना मन्ना, मधुरिमा मगन्का मैती, मनकप सेलोन नोकवोहम, रितागनिकी देबारती भट्टाचार्या अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ऋतुजा माने या समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्थेच्या महिला अध्यक्षा आहेत. ‘एफटीआयआय’च्या आवारात मंगळवारी ‘रिमेंबर बाबरी डेथ ऑफ कॉन्स्टिट्यूशन’ अशा आशयाचे फलक लावल्याची माहिती मंगळवारी दुपारी मिळाली. त्यानंतर माने यांनी याबाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पडवळ आणि कार्यकर्त्यांना दिली.
दम्यान, ‘एफटीआयआय’च्या आवारात स्टुडंट्स असोसिएशनने फलक लावल्यामुळे सामाजिक ऐक्याला बाधा पोहचण्याची शक्यता आहे. धार्मिक सलोखा बिघवडविण्याचे काम विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचे माने यांनी फिर्यादीत म्हटले आहे. डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिपीन हसबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.