अजित जगताप
वडूज : महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण पेय जल योजना कार्यान्वित केली परंतु या योजनेच्या लाभार्थींना पाणी मिळते की नाही, याची तपासणी करणारी यंत्रणा नसल्यामुळे खटाव तालुक्यातील दरजाई या गावाला राष्ट्रीय ग्रामीण पेय जल योजना व खर्च पाण्यात गेल्याचे अधोरेखित झाले असून येथील पिण्याच्या पाण्याची टाकी बारा वर्षांपासून कोरडीच आहे.
याबाबत माहिती अशी की, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय पेय जल योजना कार्यान्वित केली. यासाठी भूसंपादन देखील करण्यात आले. वरजाई (ता. खटाव) येथे २०११-१२ मंजूर व २०१२-१३ साली पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्यात आली. सदर टाकीच्या पिण्याच्या पाण्याचे उपयोग करण्यासाठी किंवा त्याच्या कामकाजाबाबत कोणीही तपासणी न केल्यामुळे गेली बारा वर्ष सदरची पिण्याची पाण्याची टाकी कोरडी ठणठणीत राहिलेली आहे.
ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने हे काम केले. विशेष म्हणजे या पाणीपुरवठा योजनेसाठी २०१९ च्या मे महिन्यात ९०,०००,५०,००० ,२९,०४७ रुपये, ५५ हजार रुपये २९८ असा खर्च केल्याच्या पावत्या संबंधितांकडून घेण्यात आल्या आहेत. या निधीचा वापर कशासाठी झाला? याची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.
अजूनही तीस वर्षांपूर्वीच्या बांधण्यात आलेल्या टाकीतून वरजाई गावाला पाणी पुरवठा होत आहे, अशी माहिती राहुल कदम, विजय पाटोळे, निलेश सत्रे यांनी दिली. याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही देण्यात आला आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी तसेच माजी पंचायत समितीचे सदस्य नंदकुमार गोडसे यांनी पाठपुरावा करून सदर प्रकरणात लक्ष घातले असल्याने तालुक्यातील अनेक एक वादग्रस्त प्रकरण चव्हाट्यावर आले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.