मुंबई : शासकीय कार्यालयांमध्ये सध्या वैयक्तिक कार्यक्रमांना प्राधान्य दिले जात असल्याचे प्रकार वाढत चालले आहेत. वाढदिवसाचे केक कापणे, वैयक्तिक पार्ट्या करणे यावर आळा घालण्यासाठी आता राज्य सरकराने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ च्या अनुषंगाने शासनाने यासंदर्भात एक परिपत्रक सादर केले आहे. कार्यालयीन वेळेत, कार्यालयीन जागेवर वैयक्तिक समारंभ घेणे, हा शिस्तभंग मानला जाईल, असे या परिपत्रकात स्पष्ट केले आहे. अशातच आता यापुढे शासकीय कार्यालयांमध्ये वाढदिवस साजरे करण्यावर मर्यादा लागणार आहेत.
अनेकदा कार्यालयीन वेळेतच अधिकारी वा कर्मचाऱ्यांचे वाढदिवस साजरे केले जातात. भाषणांचे सत्रही रंगते. यामुळे अनेकदा कार्यालयात आलेल्या नागरिकांना ताटकळत बसावे लागते. ही परिस्थिती लक्षात घेऊन जमावबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी परिपत्रक काढून यासंबंधित स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम काय म्हणतो ?
या नियमानुसार, कोणताही सरकारी कर्मचारी कार्यालयीन वेळ आणि ठिकाणी अशासकीय, वैयक्तिक, धार्मिक वा सामाजिक कार्यक्रम आयोजित करू शकत नाही. नियम क्रमांक ४, ५ व २२ अंतर्गत कर्मचाऱ्यांकडून शिस्तबद्ध, पारदर्शक आणि लोकाभिमुख वर्तणूक अपेक्षित आहे.
नियम मोडल्यास काय कारवाई होणार ?
महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ नुसार, शासकीय कर्मचारी कार्यालयीन वेळेत वैयक्तिक कार्यक्रम किंवा अन्य अनधिकृत वर्तन केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. अशास्थितीत कर्मचाऱ्याला नोटीस मिळू शकते तसेच काही प्रकारांमध्ये दंड देखील आकाराला जाऊ शकतो.







