लोणी काळभोर(पुणे) : नागरिकांची महसूल विभागातील कामे लवकर होण्यासाठी शासनाने आता ई-हक्क प्रणाली सुरु केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून शेतकरी घरबसल्या ७ ते ८ प्रकारचे फेरफार अर्ज करू शकतात. यात सातबारे, आठ अ, फेरफार, सातबारावर बोजा चढवणे, कमी करणे, नाव दुरुस्त करणे, वारस नोंदी करणे, ई-करार करणे इत्यादी सेवेंचा लाभ घेऊ शकतो.
नागरिक हे दाखले सेतू, आपले सरकार सेवा केंद्र, महा ई-सेवा केंद्रातून ऑनलाईन अर्ज करून केवळ २५ रुपयात घेऊ शकतात, असे आदेश महाराष्ट्र शासनाचे सहसचिव संजय बोरकर यांनी मंगळवारी (ता.०५) एका परिपत्रकाद्वारे जारी केले आहेत.
शासन परिपत्रकान्वये ई-फेरफार प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व अधिकार अभिलेखामधील गाव नमुना सातबारा व आठ अ डिजिटल स्वरूपात उपलब्ध केले आहेत. सदर संगणकीकृत अभिलेखापैकी जे अभिलेख डिजिटल स्वाक्षरीत स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच अधिकार अभिलेखामध्ये फेरफार घेण्याची संपूर्ण प्रक्रिया संगणकीकृत करण्यात आली असून, त्यासाठी राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र पुणे यांच्यामार्फत ई-फेरफार प्रणाली विकसित केली आहे.
दरम्यान, यापूर्वी अनोंदणीकृत दस्ताचे फेरफार नोंदविण्यासाठी खातेदार नागरिकाला तलाठी कार्यालयात समक्ष अर्ज कागदपत्रांसह दाखल करावा लागत असे. यासाठी आता ई-हक्क प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. याद्वारे कोणत्याही खातेदार नागरीकांना फेरफारसाठी अर्ज ऑनलाईन पध्दतीने आवश्यक कागदपत्र अपलोड करून ई-हक्क प्रणाली व्दारे थेट संबंधित तलाठी यांच्याकडे दाखल करता येणार असल्याने नागरिकांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही.
ई-हक्क प्रणालीव्दारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध
डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख सामान्य जनतेला उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा सेवा केंद्र यांनी आकारावयाच्या नक्कल फीबाबत एकवाक्यता राहावी व नागरिकांची आर्थिक पिळवणूक होवू नये. याकरीता तसेच ई-हक्क प्रणालीव्दारे नागरिकांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
केवळ २५ रुपयात मिळणार कागदपत्रे
सेतू/आपले सरकार सेवा केंद्र / महा ई-सेवा केंद्र यांच्यामार्फत ई-करार, बोजा दाखल करणे / गहाणखत, वारस नोंद, मयताचे नाव कमी करणे, अ.पा.क. शेरा कमी करणे, एकुम्या (एकत्र कुटुंब प्रमुख) नोंद कमी करणे, विश्वस्थांचे नाव बदलणे, या सुविधांची कागदपत्रे केवळ २५ रुपयात मिळणार आहेत.
खातेदारास निःशुल्क सेवा
महसूल विभागातील ८ सुविधांसाठी केवळ २५ रुपये फी आकारने बंधनकारक आहे. तसेच अतिरिक्त पृष्ठे असल्यास प्रतिपृष्ठ २ रुपये एवढे अतिरिक्त शुल्क सेवा केंद्र चालकास घेता येईल. तथापि, कोणत्याही खातेदार नागरीकाने वैयक्तिकरित्या सदर कागदपत्रे अपलोड केल्यास, सदर सेवा खातेदार नागरीकास निःशुल्क राहील.
– सरिता नरके (राज्य समन्वयक – ई फेरफार प्रणाली)