पुणे : सतीश वाघ हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा उलगडा करण्यात पुणे पोलिसांना यश आलं असून दोन आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघने आपल्या पतीच्या हत्येची सुपारी दिल्याचे आता उघड झाले आहे. या प्रकरणातून आता नवनवीन खुलासे समोर येत असून अशातच आता पती सतीश वाघ याचेही बाहेर अनैतिक संबंध होते, माझा तो गेल्या १० वर्षांपासून शारीरीक व मानसिक छळ करत होता, हा सर्व त्रास असह्य झाला होता, असा आरोप सतीश वाघ खुन प्रकरणातील आरोपी व त्यांची पत्नी मोहिनी वाघ यांनी चौकशी दरम्यान केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मांजरी येथील शेतकरी व हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांचा ९ डिसेंबर रोजी निर्घुण खुन करण्यात आला होता. हा खुन त्यांचा भाडेकरु अक्षय जावळकर यानेच सुपारी देऊन केला, हे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणाचा पुढे तपास करीत असताना पोलिसांना अक्षय जावळकर व सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांच्यात व्हॉटसअॅप चॅट सुरु असल्याची माहिती समोर आली.
त्यानंतर पोलिसांनी मोहिनी वाघ हिची चौकशी केली. त्यात तिने आपले अक्षय जावळकर याच्याशी संबंध असल्याचे कबूल केले. तसेच आपला पती सतीश वाघ याचा खुन करण्यास अक्षय जावळकर याला सांगितल्याचेही मान्य केले आहे. त्यानंतर पोलिसांनी मोहिनी वाघ हिला अटक केली. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली.
मोहिनी वाघ हिनेही तपासादरम्यान सतीश वाघवर गंभीर आरोप केले आहे. सतीश वाघ हे आपल्याला मारहाण करीत. खर्चाला पैसे देत नसत. त्यांचेही बाहेर अनैतिक संबंध होते, असा आरोप मोहिनी वाघ हिने केला आहे.
अतिश जाधव याला धाराशिव येथून ताब्यात..
अतिश जाधव याला धाराशिव येथून ताब्यात घेतले होते. त्याच्या धाराशिव येथील घरातून त्याचे रक्ताने माखलेले कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत. अतिश जाधव याला अक्षय जावळकर याने खुन करण्यासाठी ५ लाख रुपये दिले. त्याबाबतचा तपास करण्यासाठी पोलिसांनी अक्षयची सर्व बँक खाती तपासण्यात आली आहेत, अशी माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी दिली.