सुरेश घाडगे
परंडा : नुकसाण झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ मदत देण्यात यावी. या मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा तहसिलदार यांना सोमवारी (ता. ३१) देण्यात आले आहे.
खरिप हंगाम २०२० अंतर्गत सोयाबीन पिकाचा विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या यादीत विसंगती असल्याबाबत तसेच सततचा व २०२२ मधील पाऊस, अतिवृष्टी व रोगराईमुळे नुकसाण झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ मदत देण्यात यावी यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, प्रधान मंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२० अंतर्गत पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या ३५ हजार ९५८ ऐवढी असताना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या यादीत फक्त ३ हजार १६३ ऐवढीच संख्या असुन या दोन्हीत विसंगती असल्याचे आढळुन आले आहे. सन २०२० च्या खरीप हंगामामध्ये विमा कंपनीचे पोर्टल काही तांत्रिक अडचणीमुळे बंद पडले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ऑफलाईन पध्दतीने विमा भरलेला होता.
दरम्यान, या शेतकऱ्यांच्या सुधारित यादीत समावेश अद्यावत यादीत करण्यात यावा. तसेच सप्टेंबर, ऑक्टोबर २०२२ मधील सततचा पाऊस, अतिवृष्ठी व रोगराईमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत तात्काळ जाहीर करण्यात यावी. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख गौतम लटके, तालुकाप्रमुख मेघराज पाटील, युवा नेते रणजित पाटील, जनार्दन मेहेर, सुभाष शिंदे, शहरप्रमुख इरफान शेख आदि उपस्थित होते.