अहमदनगर : ट्रान्सपोर्टची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकच्या केबिनमध्ये कोतवाली पोलिसांना देशी-विदेशी दारूचे सात बॉक्स आढळून आले. याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी मुद्देमालासह ट्रक व चालकास ताब्यात घेतले आहे.
अरुण सुखदेव लंके (रा.चिखली ता.श्रीगोंदा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोतवाली पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक मालवाहतूक ट्रक (एम.डब्लू.ए ३९४९) या गाडीत बेकायदा दारूची वाहतूक होत आहे. ही माहिती प्राप्त होताच गुन्हेशोध पथकाच्या अंमलदारांनी कायनेटिक चौकात सापळा लावून ट्रक थांबवून पाहणी केली असता ट्रकच्या केबिनमध्ये सात देशी-विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले. त्याच्या ताब्यातील १० लाख ५२ हजार ८०० रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला असून, यामध्ये वाहतूक ट्रक व देशी-विदेशी दारूचा समावेश आहे.
पोलिस कॉन्स्टेबल कैलास शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अरुण सुखदेव लंके या ट्रक चालकावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल गणेश धोत्रे करत आहेत.
दरम्यान, ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अमोल गाढे, संदीप थोरात, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत आदींनी केली आहे.