आपल्यापैकी अनेकांनी ‘वर्क फ्रॉम होम’ अर्थात घरातून काम कधीना कधी केलं असेलच. कोरोना महामारीच्या काळात अनेक उद्योगांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली होती. यानंतर काही कंपन्यांनी कायमस्वरूपी ‘वर्क फ्रॉम होम’ सुरु ठेवलं. मात्र, याच ‘वर्क फ्रॉम होम’मुळे आपल्या कामावर शंका उपस्थित केली जाऊ शकते. त्यामुळे काही गोष्टींची काळजी नक्की घ्या.
घरातून काम करणे नक्कीच चांगले आहे. परंतु, हे करत असताना कर्मचाऱ्यांना काही आव्हानांना तोंड द्यावे लागते. घरून काम करताना तुमच्या बॉसवर छाप पाडणे हे देखील मोठे आव्हान असते. कर्मचाऱ्याने त्याच्या बॉस किंवा व्यवस्थापकाला त्याची प्रगती, आव्हाने आणि यशाबद्दल अपडेट करणे महत्त्वाचे बनते. तुम्ही जबाबदार आणि विश्वासार्ह आहात हेदेखील त्यांना दाखवून देणं गरजेचे आहे. संभाषण करताना शब्द आणि भाषेच्या निवडीची विशेष काळजी घ्या.
नियमित संभाषण ठेवणे गरजेचे आहे. क्वालिटी वर्कवर लक्ष द्या. तुमच्या बॉसला प्रभावित करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याच्या अपेक्षा पूर्ण करणारे किंवा त्यापेक्षा जास्त दर्जेदार काम करणे. यासाठी कर्मचाऱ्याने आपण आपल्या जबाबदाऱ्यांशी बांधील असल्याचे दाखवून दिले पाहिजे. घरून काम करताना वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखणे कठीण आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे कामाचे तास सेट करणे गरजेचे होते. याने तुम्हाला काम करताना फायदा होऊ शकतो.