बापू मुळीक / सासवड : मकर संक्रात अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे पतंगोत्सवाची तयारी सर्वत्र सुरु आहे. आतापासूनच आकाशात विविदरंगी पतंग पाहायला मिळत आहेत. मात्र, तुम्ही नायलॉनचा मांजा वापरत असाल तर सावधान, नेमकं याचं कारण काय आहे जाणून घेऊयात.
डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीच्या सणानिमित्ताने देशभरात पतंग उडवण्याची स्पर्धा रंगते. मात्र, या पतंगबाजीसाठी वापरला जाणारा नायलॉनचा मांजा अनेकांसाठी जीवघेणा ठरत आहे, तर या मांजामुळे अनेकांना कायमचं अपंगत्व देखील आलं आहे, त्यामुळे सरकारने नायलॉन मांजावर बंदी घातली आहे.
पतंगासाठी नायलॉन मांजाचा वापर केला जात असून यामुळे पक्षी, प्राणी आणि दुचाकी स्वरांना इजा होत आहे, तसेच पर्यावरणाची हानी देखील होत आहे. दरम्यान, नायलॉन मांजावर उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पोलिसांनी एक आदेश जारी करून, नायलॉन मांजाचा वापर विक्री आणि साठा करण्यावर बंदी घातली आहे. असं असतानाही काही दुकानांमधून नायलॉन मांजाची विक्री होत असल्याचे आढळले आहे
याच पार्श्वभुमीवर पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत, नायलॉनचा मांजा विकणाऱ्यांविरोधात आणि वापरणाऱ्या मुलांच्या पालकांविरोधात पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारत भारतीय न्याय संहितेच्या ११० कलमांतर्गत थेट खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे, त्यामुळे मांजा विक्री करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
नायलॉन मांजा किती घातक?
मकर संक्रातीचा सणाच्या निमित्ताने पतंग काटण्याची स्पर्धा रंगत असते, मात्र तुमचा आनंद एखाद्याचं आयुष्य उध्वस्त करू शकतो. त्यामुळे न्यायालयाचे निर्देश, पोलीसांची कारवाई लक्षात घेऊन नायलॉन मांजा वापरणं टाळा, नाहीतर गुन्हा दाखल होऊन तुमचं आयुष्य उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.