पुणे : भारतीय नागरिकांनी प्रवासासाठी रेल्वेचा सुखकर व सुविधांयुक्त प्रवास असल्याने सर्वात पहिली पसंती रेल्वेला दिली आहे. मात्र, रेल्वेत प्रवास करताना नागरिकांनी रेल्वेच्या नियमांचे पालन न केल्यास रेल्वे प्रशासन तुमच्यावरही कारवाई करू शकते.
रेल्वेत प्रवास करताना प्रवाशांनी रेल्वेत रात्री दहाच्या आधी रेल्वेच्या पॅन्ट्रीमधून जेवणाची ऑर्डर दिलेली असते, त्यांना जेवणे दिलेले असते. त्यानंतर इतर सहप्रवाशांचा विचार करता लोकांनी हळू आवाजात गप्पा मारणे अथवा हेडफोनचा वापर करून गाणे, व्हिडीओ बघणे गरजेचे असते.
यासह रेल्वेतील नाइट लाइट वगळता अन्य लाइट देखील बंद करणे गरजेचे असते; पण अनेकदा काही लोक, मोठा ग्रुप असेल तर ती मंडळी जोरजोरात आवाज देत बोलत असतात. यामुळे रेल्वेच्या डब्यात प्रवास करणाऱ्या इतर सहप्रवाशांना त्याचा त्रास होत असतो.
दरम्यान, हा नियम रेल्वेच्या अन्य नियमांप्रमाणेच आहे. पण अनेकदा प्रवाशांना याबाबत माहिती नसते. मात्र सहप्रवाशाने टीसीकडे यासंबंधी तक्रार केली, तर अशा लोकांना अपमानाला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. तसेच टीसीने समजवून सांगितल्यानंतरही जर लोकांनी ऐकले नाही तर पुढील रेल्वे स्थानकावर त्या ग्रुपला, लोकांना उतरवून दिले जाऊ शकते. त्यात गोंधळ करणाऱ्यांनी मद्य सेवन केले असेल, तर त्यांच्यावर गुन्हादेखील दाखल होऊ शकतो.
याबाबत बोलताना रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर म्हणाले कि, मुळात आपल्यामुळे इतर सहप्रवाशांना त्रास होईल असे वर्तन करणे चुकीचे आहे. पुणे विभागात आजपर्यंत अशा कोणत्याही व्यक्तीवर कारवाई झाली नाही. मात्र प्रवास्यांनी रेल्वेच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.