लोणी काळभोर, (पुणे) : पुणे- सोलापूर महामार्गावर हडपसर ते उरुळी कांचनदरम्यान मांजरी बुद्रुक येथे बाजार समितीसमोर, शेवाळेवाडी, फुरसुंगी फाटा, लोणी स्टेशन, कुंजीरवाडी व उरुळी कांचन गावातील तळवाडी चौकात वाहतुकीची कोंडी, अपघात, ही बाब नित्याचीच झाली आहे.
त्यातच महामार्गावरील गावात सूरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना नसल्याने अपघाताच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. काय तो चिखल, काय तो रस्ता, काय खड्डे, काय लाईट, काय पार्कींग, व्वा व्वा सगळं कसं ओके मधी हाय. त्याची मुख्य कारणेहि तशीच आहेत.
टोलची मुदत संपली कामे थांबली…!
पुणे- सोलापुर महामार्गवरील कदमवाक वस्ती (ता. हवेली) हद्दीतील कवडीपाट ते कासुर्डी (ता. दौंड ) या दरम्यानचा रस्ता सतरा वर्षापुर्वी “बाधा, वापरा व हस्तातंरीत करा (बिओटी)” या तत्वानुसार आयआरबी या खाजगी कंपनीने विकसीत केला होता. मात्र चार वर्षापुर्वी मुदत संपल्याने चार वर्षापुर्वी आयआरबी कंपनीने वरील रस्ता शासनाकडे हस्तातंरीत केला आहे. मात्र याची एकदाही दुरुस्ती अथवा डागडुजी करण्यात आली नाही. कवडीपाट टोलनाका मुदत संपल्याने बंद करण्यात आल्याने हा रस्ता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) विभागाने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.
महामार्गावर अनेक अडथळे…!
रस्त्यालगत वाढलेली हॉटेल, ढाब्यांची संख्या, त्यावर राजरोसपणे होणारी अवैध दारूविक्री, काही हॉटेल व्यावसायिकांच्या भल्याचा विचार करून हॉटेलसमोर रस्त्यावर घातलेले गतिरोधक, लोकांनी सोईसाठी अनधिकृतपणे फोडलेले रस्तादुभाजक, व्यावसायिकांनी बेकायदा मुख्य रस्ता व सेवा रस्त्याला जोडण्यासाठी मुरूम टाकून तयार केलेला जोड रस्ता व सेवा रस्त्यावर वाढलेले नागरिकांची अतिक्रमण यांसारख्या अनेक गोष्टी वाहतुकीसाठी असुरक्षित झालेल्या आहेत.याचबरोबर रस्त्यावर वाहने थांबविणे, दारू पिऊन वाहने चालविणे, लेनची शिस्त न पाळणे यामुळेही अपघातास आमंत्रण मिळत आहे. यामुळे या गोष्टींना आळा घालून चालकांमध्ये प्रबोधन करण्याबरोबरच बेकायदा गोष्टींना आळा घालण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
महामार्गाच्या दोन्ही बाजूला मातीचा खच…!
कवडीपाट टोलनाका ते उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात नर्सरी व्यवसायिक आहेत. यावेळी नर्सरीतील झाडे आणण्यासाठी जाणारे ट्रक, टेम्पो तसेच लहान वाहने येण्याजाण्याने त्यांच्या टायरला चिखल लागून येत असल्याने हा चिखल महामार्गावर येत आहे. त्यामुळे या चिखलामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मातीचा खच पडला आहे.
लोखंडी जाळ्या मोडलेल्या अवस्थेत तर कमी उंचीचे रस्ता दुभाजक…!
सेवा रस्त्यावर असलेल्या लोखंडी कुंपणाच्या जाळ्या वाकड्या तसेच मोडलेल्या अवस्थेत असून सेवा रस्त्यावरून येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. विविध व्यावसायिकांनी आपापल्या व्यवसायाची जाहिरात म्हणून बोर्ड लावलेले लावले आहेत. लोणी काळभोर ते उरुळी कांचन या ग्रामपंचायत हद्दीतील महामार्गाच्या बाजूला असलेल्या अनेक ठिकाणी रस्त्याच्या पृष्ठभागाचा असमतोल, कमी उंचीचे रस्ता दुभाजक, पुसलेले झेब्रा क्रॉसिंग, खचलेल्या साईड पट्टया, मुख्य रस्ता च सेवा रस्त्यादरम्यान तुटलेल्या जाळ्या, धोक्याच्या व अपघाताच्या ठिकाणी आढळून येत आहेत.
महामार्गाच्या मध्येच पाणी साचण्याचे प्रमाण…!
पावसाने अजूनही जोर धरलेला नाही. मधूनच येणाऱ्या पावसाच्या हलक्या सरींनी लोणी काळभोर, कुंजीरवाडी, कोरेगाव मूळ, उरुळी कांचन या ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या महामार्गाच्या मध्येच पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत मुख्य रस्त्यावर पाणी साचून निर्माण होणारे तळे त्रासदायक ठरत आहेत. रस्त्यांच्या कामाच्या वेळी पावसाच्या पाण्याच्या निचरा करण्याची व्यवस्थाच केली नसल्याने ही समस्या निर्माण होत आहे…
महामार्ग व सेवा रस्त्यावर अवैध पार्किंग…!
पुणे-सोलापूर महामार्गावर अवैधरीत्या वाहने पार्किंग करणाच्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महामार्ग पोलीस तसेच हायवे प्रशासन कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध करताना दिसून येत नाही. त्यामुळे महार्गावर वाहनचालकालाच आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या बाजूला दिवसभर आपली वाहने पार्किंग करीत असल्याने आतापर्यंत अनेक अपघातही या ठिकाणी घडले आहेत. अपघात घडल्यानंतर काही दिवस हळहळ व्यक्त करून पुन्हा त्याच ठिकाणी वाहने पार्किंग केली जात आहेत.
धुळीमुळे नागरीक व वाहनधारक हतबल…!
पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात रस्त्यावरील धुळीमुळे अनेकांना श्वसनाचे आजार बळावले आहेत. रस्त्याच्या कडेला असणारे दुकानदार व रस्त्याने जाणारे- येणारे वाहनधारक यामुळे त्रस्त झाले आहेत. प्रवासी वाहने, अवजड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वर्दळीमुळे अधिक तीव्रतेने धुरळा उडत आहे. सध्या वाहणारे जोरदार वारे व वाहनांच्या वेगामुळे धुळीचे लोट उडत आहेत. त्यामुळे या धुळीमुळे नागरीक व वाहनधारक हतबल झाले आहेत. महामार्गावर दुचाकी चालकांचे अपघात होत असून अनेकांना यामुळे अंपगत्व आले आहे.
लाईट कटिंग बॅरिअर्स
सदर महामार्गावर लाईट कटिंग बॅरिअर्स ठिकठीकाणी तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी होणारे अपघात वाढले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी होणारे अपघात टाळण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी तुटलेले लाईट कटिंग बॅरिअर्स बसवावेत.
धोकादायक स्थळी हायमास्ट दिवे
कवडीपाट रस्त्याकडे जाणऱ्या महामार्गाच्या मधोमध, लोणी स्टेशन, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, कोरेगाव मूळकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला, हायमास्ट दिवे लावण्यात यावे. तसेच दिशादर्शक फलक व चिन्हे कोणत्याही ठिकाणी आढळून येत नाहीत.
महत्वाचे दूरध्वनी क्रमांक
हडपसर, १५ नंबर, ते यवत परिसरात ठिकठीकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाने पोलिस, राष्ट्रीय महामार्ग, महसूल विभाग, आरोग्य विभाग नियंत्रण कक्ष, महामार्ग ठेकेदार, ॲम्ब्युलन्स यांचे सर्वांचे दूरध्वनी क्रमांक असलेला मोठा बोर्ड तयार करून तो तत्काळ लावण्यात यावा.
महामार्गाला ड्रेनेजची व्यवस्था नाही.
ड्रेनेजची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामध्ये वाहून आलेली माती व दगड, तसेच इतर कचरा साचून ड्रेनेज बंद होऊन प्रवाहात बदल होऊ नये. यासाठी दिवसातून महामार्गाच्या गस्तीसाठी नेमलेल्या पथकाने ड्रेनेज साफ करावे. दोन्ही ठेकेदार व महामार्ग विभाग यांनी घाटामध्ये जेसीबी, पोकलेन, डंपर, ग्रेडर, गॅस कटर अशी यंत्र सामुग्री उपलब्ध ठेवावी. तसेच ही यंत्रणा घटनास्थळी तत्काळ पोहचेल, अशा ठिकाणी ठेवून द्यावी.
याबाबत लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर म्हणाल्या, “पुणे सोलापूर नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. टोलनाका बंद झाल्यापासून रस्त्याची मोठ्या प्रमणात दुरवस्था झाली आहे. सतत येणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून गंभीर जखमी झाले आहेत. व रस्त्यावर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. प्रशासनाने लक्ष घालून त्वरित रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे व रस्त्यावरील कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत.”
याबाबत उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र कांचन म्हणाले, “उरुळी कांचन ग्रामपंचायतीने वारंवार राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. उरुळी कांचन हदीतील इरिगेशन कॉलनी व चौधरी माथा या दोन ठिकानी पाणी साचून अपघातांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागणार आहे. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करून निवेदन देण्यात आली आहेत. दोन्हीही बांधकाम विभागाने पुर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. रस्त्याची साधी डागडूजीही करण्यात आली नाही. सदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी साचून राहत असलेल्या ठिकाणी रस्त्याची लेवल करून द्यावे अन्यथा सदर ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल.