पुणे : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं काल निधन झालं. 92 वर्षी त्यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गुरूवारी रात्री अचानक त्यांची तब्येत खालवली. त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं. मनमोहन सिंग यांच्या रुपाने देशाने आज एक रत्न गमावलं आहे. फक्त राजकीय विश्वातच नव्हे, तर सर्वसामान्यही त्यांच्या निधनाच्या बातमीने हळहळले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी आणि महाराष्ट्रातील दिग्गज नेते शरद पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
शरद पवार यांनी मनमोहन सिंग यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. मनमोहन सिंग यांचं देशाच्या विकास प्रक्रियेत किती महत्त्वाच योगदान आहे, त्याची उद्हारणं दिली. “अनेक वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने देशाची सेवा करण्यासाठी डॉ. मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं. आज ते आपल्यामध्ये नाहीत. मनमोहन सिंग यांचा पिंड राजकारणी नव्हता. एकादृष्टीने एक अर्थशास्त्री, विचारवंत होते. सतत उद्याच देशाच भवितव्य घडवण्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे. याचा विचार करण्याची भूमिका घेत होते. माझा त्यांचा परिचय मुंबईचा होता” असं शरद पवार म्हणाले.
‘मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, त्याकाळात…’
“मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. त्याकाळात ते आरबीआयचे गर्व्हनर होते. त्यावेळी कधी ना कधी कामाच्या निमित्ताने सुसंवाद व्हायचा. त्यांच्याबद्दल एक प्रकारच आकर्षण माझ्या मनात निर्माण झालं. नंतर चंद्रशेखर देशाचे पंतप्रधान झाले, चंद्रशेखर यांच्या आर्थिक सल्लागार मंडळात डॉ. मनमोहन सिंग होते. त्यानंतरच्या नरसिंहसराव सरकारच्या मंत्रिमंडळात अर्थखात्याचे मंत्री होते” असं शरद पवार म्हणाले.
अर्थव्यवस्थेला दिशाला दिली..
“डॉ. मनमोहन सिंग हे मितभाषी होते. पण आल्या भूमिकेशी पक्के होते. नंतर देशाच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी आल्यानंतर त्या 10 वर्षात देशाला, देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा द्यायचं काम त्यांनी केलं. इतक्या संकटांचा काळ होता. देशाची आर्थिक अवस्था अस्वस्थ होती, ती सावरायची ही प्रक्रिया नरसिंहरावांच्या काळात सुरु केली. स्वत: पंतप्रधान झाल्यावर अधिक भरीव अशा प्रकारचे निर्णय घेऊन देशाला संकटातून बाहेर काढलं” असं शरद पवार म्हणाले.
अशा कर्तृत्वान, चारित्र्यसंपन्न व्यक्तीला आज देश मुकला..
“त्यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात असे अनेक निर्णय होते. उदहारणार्थ आरटीआय माहितीचा अधिकार किंवा रोजगार हमी सारखा निर्णय असे नऊ-दहा महत्त्वाचे निर्णय त्यांच्या काळात घेतले. सर्व देशाला वेगळ्या दिशेने न्यायचा प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची मोठी प्रतिष्ठा होती, असा कर्तृत्वान, चारित्र्यसंपन्न व्यक्तीला आज देश मुकला आहे” अशा शब्दात शरद पवार यांनी डॉ. मनमोहन सिंग यांचा गौरव केला.