पुणे : पुण्यातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मला तू आवडतेस, मला तू पाहिजेस, बाकी काही बोलू नकोस, मी वडगाव शेरीचा नगरसेवक बोलतोय, असं म्हणत एका अनोळखी व्यक्तीने भाजीविक्रेत्या महिलेला फोन करून त्रास दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून संबंधित अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडला आहे. ३० वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे चंदननगर परिसरात भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. ८ डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत तिच्या मोबाईल क्रमांकावर अनोळखी मोबाईल क्रमांकावरून सतत फोन आले. मला तू आवडतेस, मला तू पाहिजेस, बाकी काही बोलू नकोस, तू फक्त एस ऑर नो मध्येच बोल. मी वडगाव शेरीचा नगरसेवक बोलतोय.
तसेच माझ्या आवडत्या व्यक्तीचा नंबर मी कसा पण शोधून काढू शकतो. यावर फिर्यादीने रॉंग नंबर आहे, असे सांगितले. त्यानंतर देखील मी मनपाचा नगरसेवक बोलतोय, उद्या येतोच तुझ्या भाजीच्या दुकानावर, असं म्हणत फिर्यादीच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल अशी वर्तुणूक केली.
दरम्यान, वारंवार अशा प्रकारे फोन करून त्रास देत असल्याने संबंधित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनीही अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल असून चंदननगर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.