मुंबई : शरद पवार यांनी भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. “देशातील गृहमंत्रीपदावर काम केलेल्या दिग्गज नेत्यांची, जनसंघातील नेत्यांची नाव घेत, यातील कोणालाही तडीपार केलेलं नव्हतं. मला टीका जिव्हारी लागलेली नाही. पण संबंधित व्यक्तीची नोंद घ्यावी, अशी ती व्यक्ती नाही”, असा टोला शरद पवार यांनी अमित शहा यांना लगावला. मुंबई येथे आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिर्डीमध्ये भाजपचे महाविजय अधिवेशन पार पडले. भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिवेशनात महाविकास आघाडीतील काँग्रेससह शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांच्या परिवारवादावर सुद्धा त्यांनी जोरदार हल्ला चढवला होता. उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांकडूनही अमित शाह यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. त्यानंतर आता शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत, अमित शाहांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले, “मला टीका जिव्हारी लागली नाही, पण संबंधित व्यक्तीची नोंद घ्यावी, अशी ती व्यक्ती नाही. देशात अनेकांनी गृहमंत्री म्हणून चांगल काम केलेलं आहे. पण या लोकांना कधी तडीपार करण्यात आलं नव्हतं. देशाच्या गृहमंत्र्यांनी माझ्याविषयी काही विधान करताना, माहिती घेऊन करायला पाहिजे होती” असे सांगून 1978 मध्ये मुख्यमंत्री असताना, जनसंघाबरोबर कामं केल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार म्हणाले, ‘मी 1958 पासून राजकारणा, प्रशासनात आहे. मी 1978 साली राज्याचा मुख्यमंत्री होतो, त्यावेळी हे राजकारणात कुठे होते, हे मला माहीत नाही. मी मुख्यमंत्री असताना माझ्या मंत्रिमंडळात जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील यांच्यासारखे कर्तृत्वान लोक होते.”
जनसंघाची पार्श्वभूमी असणाऱ्या अनेक लोकांनी त्यावेळी माझ्यासोबत काम केलेया आहे. वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन यांनी देखील मदत केल्याचे शरद पवार यांनी सांगितले. भुजमध्ये भूकंप झाला होता, त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी मी विरोधी पक्षात असताना देखील मला एका समितीवर माझी नेमणूक केली होती. सगळी जबाबदारी माझ्याकडे दिली होती. असेही शरद पवार यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, “अमित शाह यांच्या तडीपार काळात असताना, ते गुजरातमध्ये राहू शकत नव्हते, त्यावेळी सहकार्यासाठी बाळासाहेबांकडे आले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंबाबात केलेलं वक्तव्य भाजप किती गांभीर्यानं घेईल?”, असा प्रश्न शरद पवार यांनी केला.