पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील दहा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानुसार गुरुवारी पुण्यातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना पदोन्नती मिळत ते जमाबंदी आयुक्त झाले आहेत. त्यांच्या जागी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पुणे जिल्हाधिकारी पदी पदस्थापना देण्यात आली आहे.
दरम्यान, जितेंद्र डुडी यांची पुणे जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाल्याने एकाच घरातील तीन अधिकारी पुण्याचा वेगवेगळा कार्यभार सांभाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुण्यासह जिल्ह्यात या कुटुंबाची जोरदार चर्चा रंगली आहे. जितेंद्र डुडी यांच्या पत्नी आंचल दलाल हे IPS असून त्या पुणे जिल्ह्यातील राज्य राखीव दलात (एसआरपीएफ) कार्यरत आहेत. त्यांचे भाऊ शेखर सिंह हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त आहेत.
पुण्याच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झालेले जितेंद्र डुडी भारतीय प्रशासकीय सेवेतील 2016 बॅचचे अधिकारी आहेत. ते मुळचे राजस्थान राज्यातील असून IAS परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना झारखंड केडर मिळाले होते. त्यांनी केंद्र सरकारमध्ये सहाय्यक सचिवपदी देखील काम केले आहे. झारखंड केडरचे असलेले डुडी यांचा विवाह IPS आंचल दलाल यांच्याशी झाला.
आंचल दलाल यांना महाराष्ट्र केडर मिळाले होते. त्यामुळे डुडी यांना महाराष्ट्र केडरमध्ये बदली मिळाली आहे. जितेंद्र डुडी यांना 2018 मध्ये महाराष्ट्र केडर मिळाले. त्यानंतर त्यांनी पुणे जिल्ह्यात जुन्नर प्रांताधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तसेच, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून देखील कारभार सांभाळला आहे. त्यानंतर ते सातारा जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. आता त्यांची बदली पुणे जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे.
दाजी, मेव्हण्याचा दुर्मिळ योगायोग
शेखर सिंह यांची पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी नियुक्ती होण्याआधी ते सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. त्यांची जुलै 2022 मध्ये बदली झाली. त्यानंतर रुचेश जयवंशी हे साताऱ्याचे जिल्हाधिकारी झाले. त्यांच्यानंतर साताऱ्याच्या जिल्हाधिकारी पदावर जितेंद्र डुडी यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे जितेंद्र डुडी आणि शेखर सिंह या दाजी आणि मेव्हण्याने साताऱ्याचे जिल्हाधिकारी पद भूषवल्याचा दुर्मिळ योगायोग साधला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानुसार ७ फेब्रुवारी २०२४ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची क्रीडा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या जागी डॉ. सुहास दिवसे यांची बदली करण्यात आली होती.
दरम्यान, डॉ. सुहास दिवसे यांनी ११ महिन्यांच्या कालावधीत लोकसभा आणि विधानसभा या सार्वत्रिक निवडणुका शांततेत पार पाडल्या. तसेच मतदार नाव नोंदणीत देखील पुणे जिल्हा आघाडीवर ठेवण्याचे काम त्यांनी केले. पुण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या वर्तुळाकार रस्त्याच्या पूर्वेकडील टप्प्याचे ८५ ते ९० टक्के भूसंपदान आणि निवाडे प्रक्रिया वेगात पूर्ण केली.