पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात न्यू इयर पार्टीची धूम असणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि परमिट रूम पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच दारूच्या दुकानांना मध्यरात्री 1 वाजेपर्यंत विक्रीची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे आता नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यप्रेमींना रात्री उशिरापर्यंत पार्टी करता येणार आहे. पहाटे पाचपर्यंत रेस्टॉरंट, बार सुरू ठेवण्यास पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. मात्र, मद्यविक्री करण्यासाठी रात्री एक वाजेपर्यंतचे बंधन घालण्यात आलं आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब, रिसॉर्ट अन् विविध क्लबमध्ये रंगणार्या पार्ट्यांचे बुकिंग हाऊसफुल्ल झाले आहे. यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येणार आहे. त्याशिवाय विविध लज्जतदार पदार्थांची मेजवानी असणार आहे. घरोघरीही हाऊस पार्टीची तयारी करण्यात आली आहे. नवीन वर्षाचे सेलिब्रेशनला रात्री दहानंतर खर्या अर्थाने सुरुवात होणार आहे.
पुण्यासह जिल्ह्यात कडक पोलिस बंदोबस्त
सरत्या वर्षाला निरोप देऊन 2025 या नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात आणि जोशपूर्ण वातावरणात होणार आहे. आपल्या मित्र-मैत्रिणी, कुटुंबीयांसह नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यात येणार आहे. मंगळवारी रात्री ठिकठिकाणी वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत अन् लाइव्ह म्युझिक बँडच्या तालावर थिरकत न्यू इयर पार्टी ठिकठिकाणी होणार आहे. दरम्यान, अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुण्यासह जिल्ह्यात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या ठिकाणी रंगणार न्यू इयर पार्टी
डेक्कन परिसर, कोरेगाव पार्क, जंगली महाराज रस्ता, कॅम्प, विमाननगर, हिंजवडी, बाणेर, बावधन, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, खराडी, विमाननगर, कोथरूड, औंध आदी ठिकाणच्या हॉटेल्स, रेस्टॉरंट, पबमध्ये मोठ्या प्रमाणात बुकिंग झाले आहे. याशिवाय जिल्ह्यातील पवनानगर, पानशेत, भूगाव, मुळशी, लोणावळा आदी ठिकाणच्या हॉटेल्स, रिसॉर्टमध्येही विविध कार्यक्रमांनी नवीन वर्षाचे स्वागत केले जाणार आहे.