पुणे : ढगाळ हवामान, पावसाची हजेरी यामुळे राज्याच्या कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. तापमानाचा पारा ३८ अंश व त्यापेक्षा खाली घसरला आहे. आज कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दक्षिणेकडील जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
आज (ता. ५) महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज असून, दक्षतेचा इशारा दिला आहे. तर कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्याच्या कमाल तापमानातील चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र परिसरावरील चक्राकार वारे, नैर्ऋत्य मध्य प्रदेशापासून दक्षिण अंतर्गत कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम होत असल्याने राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. शुक्रवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाने हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपीट झाली.