पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. या गर्भवती मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या समितीने पाठविलेल्या अहवालाबाबत पोलिसांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत. याबाबत पोलिसांनी रुग्णालयाला पत्र लिहिले आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या समितीची बैठक आज होणार असून, तातडीने अहवाल पोलिसांना सादर केला जाणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गर्भवती ईश्वरी (तनिषा) भिसे हिच्या मृत्यूप्रकरणाबाबत ससून रुग्णालयाचे समितीने पुणे पोलिसांना चौकशी अहवाल सादर केला असून या अहवालात पोलिसांनी शंका उपस्थित केली आहे. ससूनच्या अहवालात स्पष्टता नसल्याचें कारण देत पुन्हा नव्याने ससूनकडून अहवाल मागविण्यात येणार आहे.ससून रुग्णालयाच्या समितीने पुणे पोलिसांना सहा पानी अहवाल पाठविला आहे. त्या अहवालात संबंधित महिलेच्या उपचारावेळी वैद्यकीय दिरंगाई झाली का? तसेच डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला का? असे कोठेही नमूद करण्यात आले नाही. त्यामुळे डॉक्टर, रुग्णालय दोषी आहेत की नाही, याबाबत पोलिसांना काहीच बोध होत नाही. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी चार मुद्दे उपस्थित करून पुन्हा ससून रुग्णालयाच्या समितीकडे अभिप्राय मागितला आहे. यावर ससून रुग्णालयाच्या समितीची बैठक आज होत आहे. या बैठकीनंतर तातडीने पोलिसांना अहवाल सादर केला जाणार आहे.
गर्भवती मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न झाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने विविध समित्या स्थापन केल्या आहेत. त्यात आरोग्य विभाग समिती, धर्मादाय आयुक्त समिती, माता मृत्यू अन्वेषण समितीसह ससून रुग्णालयातील समितीचा समावेश आहे.