मुंबई : मुंबईतील कुर्ला पूर्व भागात असणाऱ्या कुरेशी नगर परिसरात गुरुवारी मध्यरात्री एक भीषण अपघात घडला. एका जुन्या इमारती पाडण्याचे काम सुरू असताना पोकलेन मशीन वरच्या मजल्यावर नेण्यासाठी आणलेली जड क्रेन अचानक तोल बिघडल्याने उलटली. या दुर्घटनेत 8 ते 10 जण जखमी झाले असून, त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

मध्यरात्री इमारतीच्या पाडकामादरम्यान पोकलेन मशीन क्रेनच्या साह्याने वर उचलली जात होती. याच वेळी अचानक क्रेनचा तोल गेला आणि ती थेट खाली कोसळली. क्रेनचा काही भाग लगतच्या दोन घरांवर पडल्याने मोठी हानी झाली. एवढेच नाही तर, ही क्रेन जवळच असलेल्या मुंबई लोकलच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरवर आदळल्याने रेल्वे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन बचाव पथके त्वरित घटनास्थळी दाखल झाली. मलब्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना मोठी मदत केली. या अपघातात दोन घरांसह परिसरात उभ्या असलेल्या एका कारचे आणि ऑटो-रिक्षाचे अतोनात नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून हा सर्व परिसर तात्काळ सुरक्षित करण्यात आला असून, क्रेन बाजूला हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे.

क्रेन नक्की कशामुळे उलटली याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. क्रेनमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता, क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलले जात होते की कामगारांकडून काही हलगर्जीपणा झाला, या सर्व कोनातून चौकशी सुरू आहे. याशिवाय, डिमोलिशनचे काम करताना आवश्यक सुरक्षा नियमांचे योग्य पालन केले गेले होते की नाही, याचीही तपासणी केली जाणार आहे.







