लोणावळा: कार्ला लेणी परिसरात बुधवारी दुपारी आलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला. यात काही भाविक किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी कार्ला लेणी परिसरात एकवीरा देवीच्या दर्शनासाठी अनेक भाविक दाखल झाले होते. अनेक जण पालख्या घेऊन गडावर आले होते. वाद्यांचा जोरदार आवाज आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे लेणी परिसरात असलेले मधमाशांचे पोळे उठले आणि त्यांनी गडावर आलेल्या
भाविकांवर हल्ला केला. त्यामुळे गडावर काही काळ भाविकांची धांदल उडाली. भाविकांच्या या पळापळीने मधमाशा आणखीच सैरभैर झाल्या. दुपारी साधारण १२.३०च्या सुमारास ही घटना घडली.
अतिउत्साही भाविक व पर्यटक आणि नियोजनाचा अभाव यामुळे अशा घटना घडत असतात. सुदैवाने यात मोठा अनुचित प्रकार घडला नाही. स्थानिक ग्रामस्थ व एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांनी जखमींना तत्काळ गडावरून खाली आणले व त्यांच्यावर प्रथमोपचार केले. काही भाविकांना उपचारासाठी दवाखान्यातही हलवण्यात आले. काही कालावधीनंतर एकवीरा मंदिर परिसरातील परिस्थिती पूर्ववत झाली.