संदीप टूले / पुणे : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या नियमानुसार ‘सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी’ (सीसीएमपी) हा सेतू अभ्यासक्रम पूर्ण करणारे होमिओपॅथी डॉक्टर नोंदणीकृत वैद्याकीय व्यावसायिक म्हणून नोंदणीस पात्र ठरतात. या नियमानुसार होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीची औषधे विक्री करण्यास तसेच त्यांच्या चिठ्ठीवर रुग्णांना औषध विक्री करण्यास औषध विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासनाने परवानगी दिली आहे.
महाराष्ट्र वैद्याकीय परिषद १९६५ अंतर्गत नमूद अनुसूचीमध्ये ती व्यक्ती या कायद्यांतर्गत नोंदणीकृत वैद्याकीय व्यावसायिक म्हणून नोंदणी करण्यास पात्र ठरते. त्यामुळे सर्व औषध विक्रेते हे सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (सीसीएमपी) पूर्ण करणाऱ्या होमिओपॅथी नोंदणीकृत डॉक्टर ॲलोपॅथी औषधांची विक्री करू शकतात. तसेच किरकोळ औषध विक्रेते हे या डॉक्टरांद्वारे देण्यात आलेल्या औषधांच्या चिठ्ठीद्वारे रुग्णांना औषध विक्री करू शकतात.
मात्र, ही औषध विक्री करताना औषध चिठ्ठीवर नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांचा नोंदणी क्रमांक व सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (सीसीएमपी) प्रमाणपत्राचा क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. औषध चिठ्ठीवर या बाबी नमूद असल्याची खात्री करण्याची जबाबदारी औषध विक्रेत्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे राज्यामध्ये होमिओपॅथी डॉक्टर स्वत: रुग्णांना ॲलोपॅथी औषधांची विक्री करू शकतात. तसेच त्यांच्या चिठ्ठीवर ॲलोपॅथी औषधे मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
राज्य शासनाने मान्यता दिलेला ‘सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी’ (सीसीएमपी) उत्तीर्ण केला असल्यास संबंधित वैद्यकीय व्यावसायिकांचा नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये समावेश करण्यात येतो.
त्यामुळे ‘सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी’ हा कोर्स पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकाला आधुनिक चिकित्सा पद्धतीची औषधे वापरून वैद्यकीय व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे.
अनेक फार्मसिस्ट वर येऊ शकते उपासमारीची वेळ
फार्मसी करून मेडिकल स्टोअर्स सुरू केलेले अनेक फार्मसी सुरू आहेत. पण निर्णयाने अनेक फार्मसिस्ट लोकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. कारण डॉक्टरांना औषध विकण्याची परवानगी मिळाली, तर मेडिकल मध्ये येणाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी होईल व डॉक्टरांकडून येणारे रूग्ण पूर्णपणे बंद होतील. याचा परिणाम या व्यवसाय धरकांवर पडणार आहे.