नागपूर: ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस ने भारतात शिरकाव केला आहे. चीनमध्ये या व्हायरसची लागण झाल्यामुळे रुग्णालयात रुग्णांची प्रचंड गर्दी होत असल्याचा दावा समाज माध्यमांवर होत आहे. आता या ह्युमन मेटान्यूमोव्हायरस व्हायरसचे नागपूरात दोन संशयित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आले आहे, केंद्रीय आणि राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे.
दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव
नागपूरमध्ये एक 13 वर्षांची मुलगी आणि एक 7 वर्षाच्या मुलीत ही लक्षणं निदर्शनास आली आहेत. दोन दिवसांचा ताप आल्यानंतर कुटुंबाने एका खासगी लॅबमध्ये तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या अहवालानंतर कुटुंबाला धक्का बसला आहे. या दोन्ही मुलांना रुग्णालयात भरती करण्यात आले नसून, त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.
मुंबई महापालिका अलर्ट मोडवर
या व्हायरसचे गांभीर्य लक्षात घेत, मुंबई महानगरपालिका देखील अलर्ट मोडवर आली आहे. जेजे आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात त्यासाठी मुख्य कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. याठिकाणी संशयित रुग्णावर उपचार करण्यात येणार आहेत. तर नागरिकांना पण सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे केंद्रातली आणि राज्यातली आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांकडून आरोग्य विभागाची तातडीची बैठक
एचएमपीव्ही व्हायरस संदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी आरोग्य विभागाची तत्काळ बैठक बोलावली आहे. या बैठकीला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधवही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. नागपूरात दोन संशयित रूग्ण सापडल्यानंतर तातडीची बैठक होत आहे. ही बैठक आज दुपारी ३ वाजता सेंट जॉर्ज रुग्णालयातील आरोग्य भवनात आयोजित करण्यात आली आहे.
दोन्ही मुलांना खोकला आणि ताप
नागपुरातही ‘एचएमपीव्ही’चे दोन संशयीत रुग्ण आढळले आहेत. दोन लहान मुलांच्या अहवालातून एचएमपीव्ही संशयीत असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता, थोडे वेगळे लक्षणं असल्याने त्यांचे सॅम्पल एन आय व्ही ला पाठवण्यात आले आहेत. दोन्ही मुलांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याची गरज पडली नाही आणि दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाले आहेत.
“पालकांनी काळजी करण्याची गरज नाही, हा व्हायरस कोरोनासारखा नाही. माईल्ड आहे”. शक्य असल्यास मुलांनी मास्क घालावा, असे आवाहन नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी केले आहे.