पुणे : इतिहासातून समाजमनाला नवा आत्मविश्वास मिळतो, यामूळे विकास व प्रगतीसाठी इतिहास महत्वाचा असतो असे मत डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले. ‘मातंग समाजाचा इतिहास’ पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.
शंभर वर्षांपूर्वी मातंग समाजातल्या काही मंडळींनी वर्गणी काढून मुलांच्या शिक्षणासाठी खरेदी केलेल्या दिव्याचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे होते. यावेळी कोकाटे बोलत होते.
यापुढे बोलताना कोकाटे म्हणाले, ‘मातंग समाजाचा इतिहास’ या ग्रंथातून शंभर वर्षांपूर्वी मातंग समाजामध्ये असणाऱ्या चळवळींचे आकलन होते. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये परिवर्तनाच्या चळवळीचे विविध तरंग आपल्याला या ग्रंथातून पाहायला मिळतात. अलक्षित समुदायाचा अंधारात असलेला इतिहास सुहास नाईक यांनी प्रकाशात आणलेला आहे, हे काम निश्चितच कौतुकास्पद आहे.
के. के. सकट हे प्राच्यविद्यापारंगत समाजशास्त्रज्ज्ञ, इतिहास अभ्यासक, शिक्षण तज्ञ होते. त्याचबरोबर राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडींचे त्यांना भान होते. त्यांनी मातंगाच्या उत्थानासाठी केलेले कार्य महत्वपूर्ण होते. हे ‘मातंग समाजाचा इतिहास’ या ग्रंथातून सिद्ध होते.’
यावेळी बोलताना सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणेचे सिनेट सदस्य प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे म्हणाले, ‘इतिहास हा तटस्थ व निरपक्षपणे लिहावयाचा असतो. इतिहास अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या दृष्टीने पाहता ‘मातंग समाजाचा इतिहास’ हा कोंडीबा काशिनाथ सकट यांनी लिहिलेला ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण तत्कालीन मातंग समाजाचा इतिहास यामध्ये प्रतिबिंबित झालेला आहे. उपेक्षितांच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकण्याचा सुहास नाईक यांचा प्रयत्न अभिनंदनीय आहे.’
माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे म्हणाले की, ‘मातंग समाजाच्या इतिहासाला उजेडात आणण्याचे काम आताच्या युवा संशोधक पिढीने हाती घेणे आवश्यक आहे .सुहास नाईक यांनी हे आव्हान पेललेले आहे. त्यांनी या पुढील काळातही असेच संशोधन करावे.
पुस्तकाचे संपादन सुहास नाईक म्हणाले, ‘मातंग समाजाचे परिवर्तनाच्या चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान आहे. लहुजी साळवे यांचा विचार पुढे घेऊन कोंडीबा काशिनाथ सकट व त्यांच्या सहकार्यांनी पुण्यामध्ये एक चळवळ उभी केली होती. त्यांचे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे.’
कार्यक्रमास ज्येष्ठ नेते अंकल सोनवणे, भाऊसाहेब सोनवणे, कामगार नेते नितीन पवार ,लहुजी स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष अशोक लोखंडे यांच्यासह पुण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी स्वागत, प्रास्ताविक व ज्ञानसूर्य प्रकाशनाचे आनंद वैराट यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश नाईक यांनी केले तर आभार निलेश नेटके यांनी मानले.