पिंपरी : शहरातील एका मोकळ्या जागेत एका चादरीमध्ये गुंडाळलेला मृतदेह असल्याची बातमी हिंजवडी पोलीसांना समजली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यादरम्यान, पोलिसांनी चादरीत गुंडाळलेला तो मृतदेह तपासला असता तो मृतदेह मनुष्याचा नसून श्वानाचा असल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराने उपस्थित सर्व पोलीस चक्रावून गेले. ही घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे.
या घटनेबाबत हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सविस्तर माहिती दिली. शिंदे वस्ती येथे बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली होती. हा खुनाचा प्रकार असल्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने ही बाब वरिष्ठांना कळवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेची पथकेही घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी पोलिसांनी चादरीत गुंडाळलेला तो मृतदेह तपासला असता तो मृतदेह मनुष्याचा नसून श्वानाचा असल्याचे निदर्शनास आले. उपस्थित असलेल्या पोलीसांनी आणि अन्य व्यक्तींनी डोक्याला हात लावला. दरम्यान, या प्रकारामुळे अनेकांना ‘दृश्यम’ चित्रपटाचीही आठवण झाली.