दौंड : निष्काळजीपणा हाच रस्ते अपघातासाठी कारणीभूत ठरत असतो. सध्याचे ७३ टक्के अपघात मानवी चुकांमुळे होतात. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी प्रत्येकांने वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. असे मत (बारामती) उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी व्यक्त केले. दौंड शहरात बुधवार (दि.१५) रोजी रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन केले होते. यानिमित्त ते बोलत होते. यावेळी गोलराऊड ते एसटी बस डेपो दरम्यान वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती रॅली काढण्यात आली होती.
आपल्या भारत देशात ७ लाख अपघात दरवर्षी होतात. यात १ लाख ७० हजार लोकांचा मृत्यु होतो. दर तीन मिनाटाना एकाचा मृत्यु होतो. संपूर्ण जगाच्या एक टक्के वाहन भारतात आहे. तरी देखील जगात होनाऱ्या अपघातात भारताचा तिसरा क्रमांक येतो. १४ टक्के अपघात भारतात होतात. इतर देशात अपघाताचे प्रमाण कमी असून त्याचे प्रमुख कारण म्हणजे तिथे वाहतुकीच्या नियमांचे पालन योग्य पध्दतीने केले जाते. अति वेगाने वाहन चालविल्यामुळे अधिक अपघात होतात. नेहमी वेगावर नियंत्रण असणे गरजेचे आहे.
अपघातात घरातील कर्ता पुरूष मृत्युमुखी पडल्यास कुटुंबावर अत्यंत वाईट परिस्थिती येते. त्याचबरोबर कुटुंबाला विविध समस्या, अडचणींना तोंड द्यावे लागते. दुचाकी चालविताना दर्जेदार व योग्य आकाराच्या हेल्मेटचा वापर केला पाहिजे. चारचाकी चालविताना सीट बेल्टचा वापर केला पाहिजे. मोबाईलचा वापर टाळला पाहिजे त्यामुळे प्राण वाचण्याची शक्यता असते.
रस्त्यावरून वाहन चालवत असताना जीवाची काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे. अपघात टाळण्यासाठी शासनाकडून घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमात सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे. यामुळे अपघात कमी करण्यास यश येईल. अपघातातील जखमींना बघत बसणे, त्यांचे फोटो काढणे, यापेक्षा जखमींना मदत केल्यास त्यांचे प्राण वाचू शकतात. ही मदत जखमींसाठी सुर्वणकाळ ठरू शकते. असे मत सुरेंद्र निकम यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी मोटार वाहन निरीक्षक पद्माकर भालेकर, सहायक मोटार वाहन निरीक्षक तेजेस मखरे, शुभंम तांगडे, दौंडचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, सर्व ड्राव्हींग स्कुलचे संचालक, रिक्षाचालक मालक उपस्थित होते.