पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना महापालिका कार्यालयाच्या आवारात प्रवेश करताना हेल्मेट सक्ती करण्यात आली होती. मात्र, आता अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनाही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट पालिकेच्या प्रवेशद्वारातून आत विना प्रवेश दिला जात नाही. विभागीय आयुक्तांकडून शासकीय कार्यालयाच्या आवारात हेल्मेट सक्तीचा आदेश काढण्यात आला होता.
त्यानुसार महापालिकेतील कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली होती. परंतु, महापालिका आयुक्तांनी महापालिकेच्या आवारात येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नागरिकांना देखील सक्ती लागू केली आहे. महापालिकेत विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना विना हेल्मेट आलेल्यांना प्रवेशद्वार अडविण्यात येत आहे. दरम्यान, विभागीय आयुक्तांचा आदेश शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य आहे. त्यासोबत पालिकेत तो नागरिकांनाही अचानकपणे लागू केला आहे. परंतु, पालिकेशी संबंधित कामासाठी हेल्मेटविना महापालिकेच्या आवारात येणाऱ्या नागरिकांना या आदेशामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकांना प्रवेशद्वाराच्या बाहेरच सुरक्षारक्षकांकडून अडवले जाते. त्यामुळे सुरक्षारक्षकांशी नागरिकांच्या वादाचे प्रसंगही उद्भवत आहेत.