उरुळी कांचन: घरासमोर बांधलेल्या एका 12 ते 14 महिन्याच्या एच. एफ. जातीच्या कालवडीवर बिबट्याने हल्ला करून कालवडीचा फडशा पाडल्याची घटना रविवारी (ता. 22) पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत भवरापूर (ता. हवेली) हद्दीतील गोळीबार मैदान येथील येथील शेतकरी कचरू बबनराव कड यांचे सुमारे 15 ते 16 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

मागील काही दिवसांपासून कोरेगाव मूळ, अष्टापूर, तसेच या परिसरात सातत्याने बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले होते. किंबहुना कुंपणाच्या तारेमध्ये एक बिबट्या अडकून पडला होता. या परिसरात एक मोठ्या आकाराचा व एक लहान आकारचा बिबट्या असे दोन बिबटे परिसरात वावरत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
बिबट्याने पुन्हा एकदा आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भवरापूर येथे झालेल्या घटनेची माहिती मिळताच वन क्षेत्रपाल कार्यालयातील वन अधिकारी संभाजी गायकवाड यांनी तात्काळ आढावा घेतला. यावेळी पोलीस पाटील चंद्रकांत टिळेकर, ग्रामस्थ व नुकसानग्रस्त शेतकरी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी वन सुरक्षा कर्मचारी संभाजी गायकवाड यांनी स्थानिक नागरिकांना बिबट्यापासून सावध राहण्याबाबत मार्गदर्शन केले.

शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीती
बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात काम करण्यासाठी जाणेही धोकादायक वाटू लागल्याने शेतीच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी वन विभाग आणि पोलिसांना आवश्यक ती तातडीची पावले उचलण्याचे निर्देश द्यावेत. वन विभागाकडून बिबट्यांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू असले, तरी नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत.
टिळेकरवाडीसह परिसरात अनेक ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. बिबट्या पिंजऱ्यात जात नाहीत. शेतकऱ्यांचे नुकसान होत असलेल्या ठिकाणी जाऊन पंचनामा करून त्यांना भरपाई करण्यासाठी कार्यवाही सुरुच आहे.
संभाजी गायकवाड, वन अधिकारी,






